Join us  

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण, अभय कुरुंदकरला बडतर्फ करणार - रणजित पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 4:01 PM

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले पोलीस निरिक्षक अभय कुरुंदकर यांना नियम तपासून बडतर्फ करण्यात येईल.

मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले पोलीस निरिक्षक अभय कुरुंदकर यांना नियम तपासून बडतर्फ करण्यात येईल. तसेच त्यांना दिलेले राष्ट्रपती पदक परत घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल, असे आश्वासन गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले.अश्विनी बिद्रे प्रकरणाच्या चौकशीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य हेमंत टकले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावरील चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री रणजित पाटील म्हणाले की, १४ जुलै २०१७ रोजी अश्विनी बिद्रे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. या प्रकरणी अभय कुरुंदकर आणि त्यांचे साथीदार कुंदन भंडारी, महेश फळणीकर यांनी आधी अश्विनी बिद्रे यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते वाशी खाडीत टाकले. नौदलाच्या सहाय्याने मृतदेह किंवा त्यासंबंधीचे पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे. बिद्रे यांच्या राहत्या घरातून विविध प्रकारचे पुरावे जमा करण्यात आले असून त्यांची न्यायवैदक चाचणी सुरू आहे.या प्रकरणी ३१ जानेवारी २०१७ ला कुरुंदकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर त्यानंतर जवळपास अकरा महिन्यांनंतर ७ डिसेंबर २०१७ ला अटक करण्यात आली. तर त्यानंतर आठ दिवसांनी त्याला सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे रणजित पाटील यांनी सांगितले. यावर सदस्यांनी कुरुंदकरच्या बडतर्फीची आणि राष्ट्रपती पदक मागे घेण्याची मागणी केली. यावर, नियम तपासून कुरूंदकर यांना बडतर्फ करण्यात येईल. तसेच राष्ट्रपती पदक मागे घेण्याबाबत शिफारस करण्याची प्रक्रीया असून ती तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण