Join us

आशा भोसले, अमजद अली, अनुपम खेर यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 03:05 IST

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान (पुणे) तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही संगीत, समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, पत्रकारिता आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

मुंबई : मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान (पुणे) तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही संगीत, समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, पत्रकारिता आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर २०१८’ हा पुरस्कार सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांना घोषित झाला आहे, तर अनुपम खेर (चित्रपट), शेखर सेन (नाट्यसेवा) आणि धनंजय दातार (सामाजिक उद्योजकता) यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष योगदान’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.साहित्यिक-कवी योगेश गौर यांना ‘वाग्विलासिनी’ पुरस्कार तर ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल ‘श्रीराम गोगटे’ पुरस्कार प्रदान करण्यात येईल. सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून ‘अनन्या’ नाटकाला मोहन वाघ पुरस्कार बहाल करण्यात येईल. सेंट्रल सोसायटी आॅफ एज्युकेशनच्या अध्यक्षा मेरी बेल्लीहॉजी यांना बधिरांसाठीच्या त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पुरस्कार देण्यात येणार आहे, तर बधिरांच्या उन्नतीसाठी काम करत असल्याबद्दल आशा भोसले यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल.२४ एप्रिल रोजी षण्मुखानंद सभागृह येथे सायंकाळी ६.१५ वाजता पुरस्कार प्रदान करण्यात येईल. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित असतील.

टॅग्स :आशा भोसले