मुंबई - जिथे कचरा दिसेल तिथले फोटो काढून महापालिकेला पाठवा. त्यावर कारवाई झाली नाही तर भाजपा कार्यालयात तक्रार करा, असे बजावत केंद्रीय वाणिज्य मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी नागरिकांनाही स्वच्छता राखण्याचे आवाहन केले.
खासदार स्वच्छता मोहिमेअंतर्गत आज उत्तर मुंबईत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कांदिवली पश्चिम, चारकोप येथे खासदार पीयूष गोयल यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी स्थानिक आमदार योगेश सागर,महापालिका उपायुक्त डॉ.भागयश्री कापसे, आर दक्षिण विभागाचे सहायक महापालिका आयुक्त मनीष साळवे, उत्तर मुंबई भाजपाचे अध्यक्ष गणेश खणकर आदि उपस्थित होते.
स्वच्छता हा जीवनाचा महत्वाचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियांचा नारा दिल आहे. त्याअंतर्गत हे अभियान राबवण्यात येत असून ते कायमस्वरूपी राबवण्यात यावे अशी अपेक्षा पीयूष गोयल यांनी व्यक्त केली.
वेगवेगळ्या प्राधिकरणांकडून कामे सुरू असताना त्यांच्याकडून राडारोडा तसाच रस्त्यालागत टाकला जातो. तिथे गाळ तसाच सोडला जातो. तो त्वरित हटवण्यात यावा, अशा सूचना त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. काम सुरू आहे असे भासवण्यासाठी ठेकेदार कुठे एक तर कुठे चार कामगार ठेवून कामे करतात. त्यामुळे कामांना विलंब होतो, असे यावेळी गोयल यांनी निदर्शनास आणून दिले.
महापालिकेने दिलेल्या सूचनांनुसार ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण करण्याची जबाबदारी नागरिकांनी पाळली पाहिजे. जिथे महापालिका अधिकारी लक्ष देत नाहीत तेथील तक्रारी १९१६ या महापालिकेच्या हेल्प लाईनवर कराव्यात, असे आवाहन गोयल यांनी केले.
ई रिक्षा वाढवा
पर्यावरणाचे भान ठेऊन आता इलेक्ट्रिक आणि बॅटरीवर चालणाऱ्या रिक्शा वाढल्या पाहिजेत. त्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांना संघटित करून शत प्रतिशत रिक्षा इलेक्ट्रिक अथवा बॅटरीवर चालवण्यासाठी परावृत्त केले पाहिजे, असे आवाहन पीयूष गोयल यांनी केले.
कामचुकार ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा
रस्त्यांच्या दर्जाबाबत अजिबात तडजोड चालणार नाही. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना कायमचे ब्लॅकलिस्ट करा. जिथे खोदकामे करायची आहेत तिथे कामे सुरू करण्यापूर्वीच काम सुरू करण्याची तसेच काम संपण्याची तारीख दर्शवणारा फलक लागलाच पाहिजे, असेही त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना बजावले.