Join us  

राज्याच्या महसूल विभागात तब्बल १३ हजार पदे रिक्त, सर्वसामान्यांची कामे खोळंबली; शेतकऱ्यांना सर्वात जास्त फटका

By दीपक भातुसे | Published: April 17, 2023 8:24 AM

राज्यातील महसूल विभागातील तब्बल १३ हजार ५३६ पदे रिक्त असून यामुळे सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या कामाचा खोळंबा होत आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयांमधील या रिक्त पदांमुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- दीपक भातुसे  मुंबई : राज्यातील महसूल विभागातील तब्बल १३ हजार ५३६ पदे रिक्त असून यामुळे सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या कामाचा खोळंबा होत आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयांमधील या रिक्त पदांमुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एखाद्या कामासाठी सर्वसामान्यांना वारंवार महसूल कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र राज्यात आहे.

शेतकऱ्यांचा वारंवार संपर्क येणाऱ्या तलाठ्यांची महसूल विभागात सर्वाधिक रिक्त पदे असून हा आकडा ५ हजार ३० इतका आहे. तहसीलदार ६६ पदे, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची ५२३ पदे रिक्त आहेत. महसूल विभागातील या रिक्त पदांमुळे एकाच अधिकाऱ्याकडे अनेक कामांची जबाबदारी येऊन पडत आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार आहे. त्यामुळे त्यांच्याकडील कामेही प्रलंबित राहत आहेत. त्यात नैसर्गिक आपत्ती आली की पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात महसूल यंत्रणा गुंतते आणि मग प्रलंबित कामाचा ढीग वाढतच जातो.   

तलाठी पदभरतीची केवळ घोषणा   - महसूल विभागाने २९ नोव्हेंबर रोजी पत्र काढून तलाठी संवर्गातील ४,१२२ पदांची भरती करण्यास मान्यता दिली आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती आणि नागपूर अशा सर्व महसूल विभागातील ही रिक्त पदे एकाच वेळी भरण्यात येणार आहेत. - मात्र यासंदर्भात घोषणेपलीकडे काहीही झाले नसून तलाठी भरतीसंदर्भात अद्याप जाहिरातही प्रसिद्ध झालेली नाही. सध्या रिक्त पदांचा भार इतर तलाठ्यांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपातळीवरील सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या विविध कामांना विलंब होत आहे.  

सर्वाधिक रिक्त पदे तलाठ्यांची... nअपर जिल्हाधिकारी -     ३१ nउपजिल्हाधिकारी -     १६ nतहसीलदार -     ६६ nनायब तहसीलदार -     ४५७ nतलाठी -     ५,०३० nअधीक्षक -     १२ nउपअधीक्षक भूमी अभिलेख -     ९१ nमुद्रांक निरीक्षक -     १५ nदुय्यम निबंधक -     १८२ nमंडल अधिकारी, अव्वल     कारकून, महसूल सहायक,     लघुटंकलेखक -     २,५७५ nअराजपत्रित लघुलेखक -     १५३ nकनिष्ठ लिपिक -     ५३२ nपदसमूह ४ -     १,८१९ nशिपाई -     २,३७५

टॅग्स :महाराष्ट्रसरकारी नोकरी