Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरुणा अजूनही आहे!

By admin | Updated: June 2, 2015 04:48 IST

केईएम रुग्णालयातील परिचारिकांसाठी नेहमीच आठवणीत राहणारा आनंदाचा दिवस म्हणजे अरूणाचा वाढदिवस. १ जून १९४८ रोजी जन्मलेल्या अरुणाचा प्रत्येक

मुंबई : केईएम रुग्णालयातील परिचारिकांसाठी नेहमीच आठवणीत राहणारा आनंदाचा दिवस म्हणजे अरूणाचा वाढदिवस. १ जून १९४८ रोजी जन्मलेल्या अरुणाचा प्रत्येक वाढदिवस परिचारिका अत्यंत उत्साहाने, तिची खोली सजवून साजरा करायच्या. आजही त्यांनी अरुणाच्या आठवणींना उजाळा देत तिला श्रद्धांजली वाहून केईएम रुग्णालयात तिचा वाढदिवस साजरा केला. अरुणाच्या आठवणींनी परिचारिकांचे डोळे पाणावले होते. अरुणाच्या मृत्यूनंतर तिचा पहिला वाढदिवस तिच्या खोलीत साजरा न करता केईएम रुग्णालयाच्या आॅडिटोरिअममध्ये साजरा करण्यात आला. १ जून हा दिवस ‘नर्सिंग केअर डे’ म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा रुग्णालयाच्या अधिसेविका अरुंधती वेल्हाळ यांनी या वेळी केली. या कार्यक्रमाला शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे, अभिनेत्री चिन्मयी राघवन, नगरसेविका ममता चेंबूरकर, अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे उपस्थित होते. माजी अधिसेविका दुर्गा मेहता यांनी सांगितले, अरुणा खूप हुशार विद्यार्थिनी होती. ती खूप शिस्तीची होती. मी तिला विद्यार्थीदशेपासून पाहिले आहे. ती मला मुलीसारखी होती. तिला कळत होते. मी तिला भेटायला गेल्यावर, ‘अरुणा, कशी आहेस? तुला काही हवे आहे का? तुला कसला त्रास होतोय का?’ असे विचारायचे. तेव्हा ती शांतपणे सगळे ऐकायची. सर्वच परिचारिकांनी केलेली तिची सेवा हे सगळ्यांसाठी खूप मोठे उदाहरण आहे. अरुणा नेहमीच आपल्यासोबत राहणार असल्याचे मत अभिनेत्री चिन्मयी राघवन यांनी व्यक्त केले. अरुणाच्या अत्यंदर्शनाला मी आले नव्हते, कारण मला तिला निरोप द्यायचा नव्हता. अरुणा नेहमीच बंद खोलीत राहिली, पण तिच्यामुळेच मला अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. नाटकाच्या वेळी जेव्हा परिचारिका म्हणायच्या, तुझ्या रूपात परत एकदा अरुणा चालती-फिरती दिसली. यावेळी मन भरून यायचे. ४२ वर्षे सहकाऱ्यासाठी इतक्या आत्मीयतेने सेवा करून रुग्णालयातील परिचारिकांनी एक उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. प्रत्येक ठिकाणी सगळ्यांनाच नकारात्मकता दिसते आहे. पण त्यापलीकडे जाऊनही सकारात्मक ऊर्जा या परिचारिकांकडून मिळाली असल्याचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.