मुंबई : शिवरायांचे जीवन विलक्षण आहे व मन ओतून काम केल्याशिवाय त्यांच्या जीवनावर अशी चित्रे साकारणे शक्य नाही, असे कौतुकोदगार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्रचरित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी काढले. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आदराने आणि अभिमानाने घेतले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व आता चित्रकलेच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे या वेळी म्हणाले की, या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यात राज्याभिषेकाचे ४० फूट बाय २८ फुटांचे चित्र व्हावे, अशी इच्छा आहे. हे प्रदर्शन दिल्लीपर्यंतही पोहोचावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.काळा घोडा येथील जहांगीर कलादालन येथे शिवचरित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी उपस्थित होते. दीपक गोरे, श्रीकांत चौगुले, गौतम चौगुले या चित्रकारांनी कुंचल्यातून शिवराज्याभिषेक साकारला आहे. या सर्वांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. रायगड, राज्याभिषेक आणि महाराजांचा व्यापक दृष्टिकोन यावर १२० तैलचित्रे साकारली आहेत.हे प्रदर्शन २० जूनपर्यंत असून या प्रदर्शनाच्या निमित्ताने येथे येणाऱ्यांना इतिहास अनुभवण्याची संधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)
मन ओतल्याशिवाय कलाकृती घडत नाही
By admin | Updated: June 15, 2016 02:35 IST