भरत उबाळ, शहापूरउन्हाची काहीली वाढलेल्या शहापूर तालुक्याला पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या असून पाण्याच्या शोधात वन्यजीव गावांत, मानवी वस्त्यांमध्ये शिरु लागले आहेत. मोर, रानडुक्कर लांडोर, लांडगे, चितळ, निलगाय, काळविटांचे कळप पाणी शोधत गावांभोवती फिरु लागले आहेत. खास वन्यजीवांसाठी २०१४ या वर्षात १कोटी ७० लाख रु पये खर्चून वनहद्दीत जंगलांच्या मध्यवर्ती ठिकाणी सिमेंटचे बांधकाम करुन बशीच्या आकाराचे कृत्रिम पाणवठे वन विभागा मार्फत बांधण्यात आले होते. टंचाई काळात वन्यजीवांसाठी या कृत्रिम पाणवठयांना टँकर अथवा बैलगाडीने पाणी पुरवठा करणे तसेच त्यांची स्वच्छता व निगा राखण्याची विशेष योजना आखण्यात आली होती. मात्र या बांधकामा नंतर लगेचच त्यांकडे शहापूर प्रादेशिक वन उपविभाग व ठाणे वन्यजीव विभाग यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याने हे पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. या कृत्रिम पाणवठयांचा वन्यजीवांना काहीच उपयोग होत नसल्याने व जंगलातील पाण्याचे अन्य नैसिर्गक स्त्रोतही आटल्याने वन्यजीवांवर पाण्यासाठी नागरी वस्ती धाव घेण्याची आफत ओढवली आहे. शिवाय वनविभाग कृत्रिम पाणवठयांना पाणीपुरवठा करण्याची उपाययोजनाच राबवत नसल्याने वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठयांची ही योजना निव्वळ दिखाऊ ठरली आहे. (प्रतिनिधी)
वनांतील कृत्रिम पाणवठे झाले कोरडे
By admin | Updated: March 31, 2015 23:58 IST