Join us

उल्हासनगरात कृत्रिम पाणीटंचाई

By admin | Updated: June 2, 2014 04:21 IST

शहरात गेल्या आठवड्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यावर नगरसेवकांनी आयुक्तांना साकडे घालून जाब विचारला आहे.

उल्हासनगर : शहरात गेल्या आठवड्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यावर नगरसेवकांनी आयुक्तांना साकडे घालून जाब विचारला आहे. अखेर आयुक्तांनी सभागृह नेत्यासह नगरसेवक, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांच्या सोबत शहराचा पाहणी दौरा केला असता शहरात कृत्रिम पाणीटंचाई असल्याचे उघड झाले आहे. उल्हासनगर महापालिका हद्दीत पाणीटंचाई निर्माण झाल्याने सर्व पक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन पाणीटंचाईचा पाढा वाचला होता. मराठा सेक्शन, संभाजी चौक, संतोष नगर, ओटी सेक्शन, महादेव नगर, कॅम्प नं-३ परिसरातील स्टेशन विभाग, दहा चाळ, सुभाष टेकडी, तानाजी नगर, गायकवाड पाडा, आदी परिसरात भीषण टंचाई निर्माण झाल्याने नगरसेवक संतप्त झाले होते. सभागृह नेता धनजंय बोडारे, विरोधी पक्ष नेता राजू जग्यासी, नगरसेवक सुभाष मनसुलकर, प्रभुनाथ गुप्ता, सुनिल सुर्वे, रमेश चव्हाण आदीनी आयुक्त बालाजी खतगावकर यांची भेट घेऊन पाणीटंचाईची माहिती दिली. आयुक्त खतगावकर यांनी सभागृह नेते धनंजय बोडारे यांच्यासह नगरसेवका सोबत शहरातील पाणी वितरण व्यवस्थेची पाहणी केली आहे. जलकुंभ भरण्यापूर्वीच मुख्य जलवाहिनीतून काही स्थानिक नगरसेवक व नागरीक पाणी सोडत असल्याने शहरातील पाणीटंचाई कृत्रिम असल्याचे उघड झाले आहे. तसेच पाणी वितरण व्यवस्थेतील तांत्रिक बिघाडाने कमी-जास्त पाणी पुरवठयाने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आम आदमी पार्टीने पालिकेवर पाण्यासाठी मोर्चा काढून पाणी वितरणातील असमतोलावर टीका केली आहे. पाणी पुरवठा विभागाला कार्यकारी अभियंता नसल्याने व विभागातील अभियंत्यांची बहुतांशी पदे रिक्त असल्याचा पाणीपुरवठा व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचा आरोप सभागृह नेत्यांनी केला . शहरात पाणीपुरवठा वितरण योजनेचे काम अंतिम टप्यात असून ती वर्षाच्या डिसेंबरअखेर कार्यान्वित होणार आहे. २६७ कोटीच्या योजने अंतर्गत १२ उंच जलकुंभ, पंपिग स्टेशन उभारले असून शहरातील संपूर्ण जलवितरण व्यवस्था बदलण्यात आली आहे.