Join us

कला साधनेचे कॅनव्हासवर प्रतिबिंब, संजय साबळे यांचे साधना  

By स्नेहा मोरे | Updated: January 22, 2024 19:41 IST

Mumbai: कलासाधना करत असताना कलाकार आपले तन, मन, बुद्धी आणि वैचारिक संकल्पनेवर आधारलेले साधना : कला एक साधना प्रदर्शन कुलाबा येथील जहांगीर कला दालनात आयोजित करण्यात आले आहे.

मुंबई - कलासाधना करत असताना कलाकार आपले तन, मन, बुद्धी आणि वैचारिक संकल्पनेवर आधारलेले साधना : कला एक साधना प्रदर्शन कुलाबा येथील जहांगीर कला दालनात आयोजित करण्यात आले आहे. समकालीन चित्रकार संजय साबळे यांचे अॅक्रेलिक रंगसंगती वापरुन कॅनव्हासवर काढलेल्या नवनिर्मित चित्रांचे हे प्रदर्शन कलारसिकांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत खुले राहणार आहे.

या प्रदर्शनातील कलाकृती कलासाधना व त्या तपश्चर्येतून लाभणारी मानसिकता आणि परिवर्तनशीलता यांचा उत्तम संगम दर्शवितात आणि सर्वांना एक आगळीवेगळी अनुभूती देतात. या प्रदर्शनात त्यांनी एकूण ५४ चित्रे ठेवली असून त्यातील सर्वात मोठ्या आकाराचीही चित्रे आहेत. जहांगीर आर्ट गॅलरीत हे त्यांचे ५ वे एकल कला प्रदर्शन आहे.

एक कलाकार साधकाची भूमिका घेऊन पूर्णपणे एकाग्र व त्या विषयाशी तादात्म्य व समरसता पावून जेव्हा तो आपल्या निर्मितीत मग्न असतो तेव्हा त्यांचे मन पूर्णपणे मुक्त व निर्विकार असते आणि त्यावेळी निर्मितीत घडत जाणारे त्याच्या शैलीतील बदल व वैचारिक परिवर्तन यथावकाश त्याच्या चित्रात सामावले जातात. ही नैसर्गिक प्रक्रिया त्याला नवीन चित्रनिर्मितीसाठी प्रेरणा देते आणि त्याला आपले ध्येय गाठण्यास मदत करते. ही मानसिकता आणि त्यातून साकारलेली चित्र अर्थातच चित्रकारास अपेक्षित असणारे चित्रपरिणाम व अनुभूति प्रकर्षाने दर्शवितात. नेमकेपणा, बोलकेपणा, दृश्यमानता व दैवी संकल्पना तसेच योग्य रंगसंगती, तिचे अचूक लेपन आणि त्यातून साकारणारे अपेक्षित दृष्यपरिणाम या कलाकृती दर्शकाला एका वेगळ्या जगात नेऊन त्याच्याशी सुसंवाद साधतात, तसेच त्याला आत्मसमाधान देतात. त्यामुळे अमूर्त शैलीत काढलेली ही चित्रे सर्वांना भावतात.

टॅग्स :मुंबईकला