Join us  

खेळण्यातील बंदुकीने धमकावणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 2:47 AM

चारकोपमधील घटना; दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करू न दिल्याचा राग

मुंबई : ओव्हरटेक करण्याच्या रागात कारमधील दुकलीने दुचाकीस्वाराला धमकावण्यासाठी बंदुकीचा आधार घेतला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाताच, चौकशीत दुकलीकडील बंदूक ही खेळण्यातली असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी अमित चव्हाण आणि विराज चव्हाण या दोन भावंडांना चारकोप पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

कांदिवलीच्या चारकोप परिसरात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास तक्रारदार दुचाकीस्वाराला चव्हाण बंधू ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, दुचाकीस्वार त्यांना पुढे जायला देत नसल्याच्या रागात त्यांनी हॉर्न वाजविण्यास सुरुवात केली. वारंवार हॉर्न वाजवूनही दुचाकीस्वार बाजूला होत नसल्याने दोघांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवाय जवळील बंदुकीने त्याला धमकावले. घाबरून दुचाकीस्वाराने आरडाओरड केली. त्यानंतर तेथे जमलेल्यांनी दुकलीला पकडले. याबाबत पोलिसांना माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तपासणी करताच त्यांच्याकडील बंदूक ही दिवाळीतील फटाके फोडण्याची असल्याचे समोर आले. भररस्त्यात धमकाविल्या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :अटकमुंबईगुन्हेगारी