मुंबई : अज्ञात इसमाने आपल्यावर गोळीबार केल्याचा बनाव गोवंडीतील एका रिक्षाचालकाने पोलिसांसमोर रचला. मात्र पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करुन २४ तासांत हा बनाव उघड करत याप्रकरणी एका शाळेच्या संचालकाला अटक केली आहे. तर हा हल्ला अनैतिक संबधातून झाला असून, रिक्षा चालकावर त्याच्याच एका नातेवाईकाने हा हल्ला केल्याची माहिती विभाग सहाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवंडीतल्या शिवाजी नगर येथे राहणाऱ्या सलीम शेख या रिक्षाचालकावर अज्ञात इसमाने गोळीबार केल्याचा संदेश त्यांना शुक्रवारी पहाटे नियंत्रण कक्षातून मिळाला. ज्या ठिकाणी ही घटना घडली ती हद्द टिळक नगर पोलिस ठाण्याची असल्याने टिळक नगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर अज्ञात इसमांनी आपल्यावर हा गोळीबार केल्याचा जबाब रिक्षाचालक सलीम शेख याने पोलिसांना दिला होता. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. घटनास्थळावर पोलिसांना रिकामे काडतूसही मिळाले नव्हते. त्यामुळे हा बनाव असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. दरम्यान त्याचाच मावस भाऊ असलेल्या श्रीधर आढाव याच्याकडे परवानाधारक बंदुक असून त्यानेच हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी शिवाजी नगरमधील त्याच्या घरी जात चौकशी केली असता आढावच्या घरामधील खिडकीची काच पोलिसांना फुटलेली आढळून आली. या काचेबाबत चौकशी केली असता घरातील सर्वांनीच वेगवेगळी उत्तरे पोलिसांना दिली. मात्र काचेला पडलेले छिद्र हे बंदुकीच्या गोळीचे असल्याचे स्पष्ट होताच आरोपीने गुन्हयाची कबुली दिली. मात्र हा हल्ला कशासाठी करण्यात आला? याबाबत त्याने अद्यापही पोलिसांना काहीही माहिती दिलेली नाही. मात्र अनैतिक संबधातूनच हा हल्ला झाल्याची माहिती पोलीस सुंत्रानी दिली आहे. (प्रतिनिधी)आरोपी शाळेचा संचालक- गोवंडी शिवाजीनगर येथे राहणारा आरोपी आढाव याची याच परिसरात खासगी शाळा आहे. त्याच्याच रिक्षावर सलीम हा चालक म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याच्या घरी सलीमचे नेहमीच येणे होते. गुरुवारी सायंकाळी सलीम हा आढाव याच्या घरी आला असताना, दोघांमध्ये वाद झाल्याने हा गोळीबार झाला होता.यामध्ये सलीमच्या खांद्यातून गोळी आरपार झाली होती. पोलिसांना ही बाब समजू नये, यासाठी आढावनेच सलीमला एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. ही घडना ही शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने हा गुन्हा टिळकनगर येथून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून, अधिक तपास सुरूअसल्याची माहिती पोलीस उपायुक्त उमाप यांनी दिली.
गोळीबार करणाऱ्या आरोपीला २४ तासांत अटक
By admin | Updated: June 19, 2016 03:02 IST