मुंबई : शहर व उपनगरांत सध्या भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून, सर्वसामान्य नागरिकांना या भटक्या कुत्र्यांमुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागते. नागरिकांना होणाऱ्या या त्रासाचा प्रशासनाने चोख बंदोबस्त करावा, असे आदेश महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिले आहेत.गटनेत्यांच्या बैठकीदरम्यान महापौरांनी हे आदेश दिले असून, त्या म्हणाल्या की, शहराच्या सर्व भागांत भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे श्वानदंशाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: लहान मुलांचा यापासून बचाव करणे प्रत्येक कुटुंबीयांना जिकिरीचे वाटत आहे, तेव्हा प्रशासनाने या संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी. तसेच श्वानदंशाच्या औषधोपचाराबाबत आधुनिक पद्धत आलेली असून, त्या पद्धतीचाही सखोल अभ्यास करून त्या पद्धतच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनेही प्रशासनाने कार्यवाही करावी, असेही आंबेकर म्हणाल्या.दरम्यान, यासंदर्भात ए, बी व ई प्रभाग समितीचे अध्यक्ष मनोज जामसुतकर यांनी महापौरांना पत्र देऊन न्यायालयीन बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी केली होती. याबाबत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात महापौरांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा!
By admin | Updated: September 24, 2014 03:01 IST