कुडाळ : कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले आहे. त्यामुळे याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. केरळ येथून मुंबईच्या दिशेने जाणारी मत्स्यगंधा एक्स्पे्रस रात्री ८.३० वाजता कुडाळ स्थानकावर येणारी रेल्वे बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता आल्याने प्रवाशांची पुरते हाल झाले आहेत. जेवणाखाण्याच्या पदार्थासह पाण्याचीही आबाळ झाली असल्याने संतप्त प्रवाशांनी कुडाळ रेल्वे स्टेशनमास्तरांना सुमारे तीन तास घेराव घातला. मात्र, पोलिसांनी मध्यस्ती करत सुविधा पुरविल्याने प्रवाशांना आंदोलन मागे घेतले.कोकण रेल्वेच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोमवारी चिपळूणनजीकच्या खेर्डी येथे मालगाड्या रुळावरुन घसरल्याने रेल्वेचे वेळापत्रक पुरते कोलमडून गेले. रेल्वे प्रशासनाने बऱ्याच गाड्या सोडल्या नाहीत. मत्सगंधा एक्सप्रेसचा कुडाळ स्थानकावर येण्याचा वेळ हा रात्री साडेआठ वाजण्याचा आहे. मात्र, मंगळवारी केरळवरुन मुंबईच्या दिशेने जाणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस कुडाळ रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी ९.३० वाजता दाखल झाली. मात्र, या रेल्वेतील पिण्याचे पाणी, बाथरुममधील पाणी, जेवणाचे पदार्थ संपलेल्या स्थितीत असल्याने प्रवाशांना कोणत्याच सुविधा मिळत नव्हत्या. यामुळे प्रवासी पुरते हैराण झाले होते. यामध्ये महिला, लहान मुले, वुध्दांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. सुविधा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या मत्स्यगंधा रेल्वेतील प्रवाशांनी कुडाळ रेल्वे स्टेशनमास्तरला तीन तास घेराव घातला. मोठ्या प्रमाणात प्रवाशी संतप्त झाल्यामुळे कुडाळ रेल्वेस्थानकाला आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले होते. कुडाळचे पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आवश्यक सर्व सोयीसुविधांची पूूर्तता रेल्वे प्रशासनाच्यावतीने पूर्तता केली. त्यानंतर प्रवाशांनी घेराओ मागे घेतला. रेल्वे शासनाच्या नाकर्तेपणामुळेच हे अपघात वारंवार होत आहेत. यात प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परंतु वेळापत्रक कोलमडल्यानंतर उशिरा धावणाऱ्या रेल्वेतील प्रवाशांची काळजी घेणे, हे रेल्वे प्रशासनाचे काम आहे. परंतु निद्रावस्थेतील कोकण रेल्वे प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे. पाणी तसेच अन्य आवश्यक सोयीसुविधांची पूर्तता केल्यानंतर संतप्त झालेले प्रवाशी रेल्वेमध्ये बसले आणि दुपारी १२ वाजता रेल्वे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली. (प्रतिनिधी)
रेल्वे प्रवाशांचा घेराआ
By admin | Updated: October 8, 2014 23:04 IST