Join us  

Breaking - Arnab Goswami : अर्णब गोस्वामींचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला; आता मदार सेशन्स कोर्टावर

By पूनम अपराज | Published: November 09, 2020 3:17 PM

Arnab Goswami : गोस्वामी यांनी हायकोर्टात धाव घेतली असून आज मुबई हायकोर्टाने अर्णब यांचा अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळला आहे. त्यांना सत्र न्यायालयात जाण्याचे हायकोर्टाने सुचवले आहे.

ठळक मुद्देसत्र न्यायालयात अर्णब यांनी जामीन अर्ज दाखल केल्यानंतर त्या अर्जावर सुनावणी होईल.अन्वय नाईक व कुमुद नाईक आत्महत्या प्रकरणात या दोघांना आत्महत्यांसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णव गोस्वामी, नितीश सारडा आणि फिरोज शेख हे तिघे ४ नोव्हेंबरपासून आहेत अटकेत. मात्र आज मुंबई हायकोर्टाने अर्णब आणि फिरोज या दोघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.

दीप्ती देशमुख/ पूनम अपराज 

मुंबई - अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक झाली असून त्यांना स्थानिक कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अटकेविरोधात गोस्वामी यांनी हायकोर्टात धाव घेतली असून आज मुंबई  हायकोर्टाने अर्णब यांचा अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळला आहे. त्यांना सत्र न्यायालयात जाण्याचे हायकोर्टाने सुचवले आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाकडून अर्णब यांना दिलासा मिळालेला नाही. 

 

शनिवारी तब्बल 6 तासांच्या सुनावणीनंतरही अर्णब यांना तत्काळ जामीन देण्यास नकार देत, अर्णब यांचा अंतरिम जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता. न्या. एस एस शिंदे आणि एम.एस कर्णिक यांच्या खंडपीठाने अर्णब यांना तत्काळ अंतरिम जामीन देऊन सुटका करण्यास नकार दिला होता. मुंबईउच्च न्यायालयाने अर्णब यांचा जामीन अर्ज आज फेटाळून लावला आहे. तसेच, फौजदारी दंड संहितेच्या कलम ४३९ अंतर्गत त्यांना विनंती अर्ज करता येऊ शकतो, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. तर, सत्र न्यायालयात अर्णब यांना जामीन करण्याची मुभा देण्यात आली असून सत्र न्यायालयात 4 दिवसांत यावर निकाल देता येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. अर्णब यांच्या तत्काळ जामीन अर्जाला नकार दिल्यामुळे अर्णब यांना अजून काही दिवस कारागृहातच राहावे लागणार आहे, अंदाज आहे. १८ नोव्हेंबरपर्यंतच्या न्यायालयीन कोठडीत असलेले अर्णव गोस्वामी यांनी आजच अलिबाग सेशन्स कोर्टात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. 

आज निकाल देताना मुंबई हायकोर्टाने तातडीचा सुटका मिळण्यासाठी मुंबई हायकोर्टाने आपल्या विशेष अधिकारांचा वापर करावा, असे आरोपींनी काहीही दाखवलेले नसून त्यांना फौजदारी दंड संहितेच्या कलम ४३९ अन्वये जामीन मिळवण्यासाठी नियमित जामीन अर्ज करण्याचा मार्ग मोकळा असल्याचे सांगितले. तसेच हायकोर्टात केलेल्या याचिका आणि त्यात तातडीच्या सुटकेसाठी केलेले अर्ज हे आरोपींना सत्र न्यायालयात कलम ४३९ अन्वये जामिनासाठी नियमित अर्ज करण्यास आडकाठी ठरणार नाहीत. तो कायदेशीर मार्ग आरोपींसाठी उपलब्ध आहे’’ असे न्या. एस एस शिंदे आणि न्या. एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. अन्वय नाईक व कुमुद नाईक आत्महत्या प्रकरणात या दोघांना आत्महत्यांसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णव गोस्वामी, नितीश सारडा आणि फिरोज शेख हे तिघे ४ नोव्हेंबरपासून आहेत अटकेत. मात्र आज मुंबई हायकोर्टाने अर्णब आणि फिरोज या दोघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.

टॅग्स :अर्णब गोस्वामीउच्च न्यायालयसत्र न्यायालयआत्महत्या