Join us

मोदींच्या वर्षपूर्ती उत्सवापासून सेना दूरच

By admin | Updated: May 22, 2015 01:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकार २६ मे रोजी वर्षपूर्ती साजरी करणार असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र लंडनला रवाना झाले आहेत.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकार २६ मे रोजी वर्षपूर्ती साजरी करणार असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र लंडनला रवाना झाले आहेत. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ते मायदेशी परतणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, भूसंपादन विधेयक आणि मुंबई विकास आराखडा अशा काही मुद्द्यांवर शिवसेनेचा विरोध आहे. मात्र, शिवसेनेचा विरोध डावलून जैतापूर प्रकल्प पुढे रेटण्याची ठाम भूमिका मोदींनी घेतली आहे. मध्यंतरी ठाकरे यांचे मन वळविण्याचे प्रयत्न अरुण जेटली यांनी करून पाहिले, परंतु सेनेची या प्रकल्पाला असलेली विरोधाची भूमिका कायम आहे. २६ मे पासून पाच दिवस राज्यात भाजपा कार्यकर्ते मोदी सरकारच्या उपलब्धींची माहिती देणार आहेत. एकीकडे भाजपात असा उत्साह असताना शिवसेनेकडून मात्र कोणतेही सेलिब्रेशन होण्याची शक्यता नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घटक पक्षांची समन्वय समिती स्थापन केली असून त्यात सहभागी होण्यास शिवसेनेने नकार दिला आहे. त्यामुळे आता शिवसेनेशिवायच ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये चंद्रकांत पाटील, खा.रामदास आठवले, खा.राजू शेट्टी, आ.महादेव जानकर, आ.विनायक मेटे यांचा समावेश करण्यात आला आहे.