मुंबई : पहारेकऱ्यांनी यापूर्वीच साथ दिल्यानंतर विरोधी पक्षाची मदत घेऊन सत्ताधारी शिवसेनेने एम/पूर्व प्रभाग समितीचे अध्यक्षपद खेचून आणले. या पदासाठी आज झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार निधी शिंदे या आठ मते मिळवून निवडून आल्या. काँग्रेसचे मत शिवसेनेच्या पारड्यात पडल्याने समाजवादी पक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस-एमआयएम आघाडीचे उमेदवार अख्तर अब्दुल रज्जाक कुरेशी यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला.पालिकेच्या १७ प्रभाग समित्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होती. शिवसेना-भाजपाने प्रभाग समिती निवडणुकीत युती केल्यामुळे ए, बी, ई वगळता १५ प्रभागांत अध्यक्ष बिनविरोध निवडून आले. आज एम पूर्व प्रभाग समितीसाठी निवडणुकीत समान संख्याबळ असल्याने पेच निर्माण झाला. मात्र काँग्रेस सदस्याने शिवसेनेच्या पारड्यात मत टाकल्याने निधी शिंदे निवडून आल्या.अशी केली शिवसेनेने खेळीएकूण १५ सदस्य असलेल्या या प्रभाग समितीमध्ये शिवसेनेचे ६, भाजपाचा १, काँग्रेसचा १, राष्ट्रवादीचा १, सपाचे ५ आणि एमआयएमचा १ असे पक्षीय बलाबल आहे. या निवडणुकीत१५ सदस्यांनी सहभाग घेतला. मात्र शिवसेनेच्या खेळीमुळे शिंदे यांना८ मते मिळाली.
प्रभाग समिती निवडणुकीत सेना-काँग्रेस युती; एम/पूर्वमध्ये शिवसेनेच्या निधी शिंदे विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 02:48 IST