मुंबई : अभिनेता अरमान कोहली याच्या ड्रग्ज कनेक्शन संबंधातून अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ नायजेरियन नागरिकांसह चौघा जणांना अटक केली आहे. मुंबई महानगरात विविध ठिकाणी छापे टाकून ही कारवाई करण्यात आली.
एनसीबीने शनिवारी अरमानच्या घरी छापे टाकून कोकेन जप्त केले होते. त्याला अटक करून दक्षिण अमेरिकेतून मागविण्यात आलेल्या कोकेनच्या तस्करीचा तपास केला असताना दोन विदेशी नागरिकांसह चौघांना अटक करून ११८ ग्रॅम एमडी व १३ ग्रॅम कोकेन जप्त केले. जुहू गल्ली येथून मोहम्मद एजाज सय्यद ऊर्फ चिया भाई याला पकडून एमडी जप्त केले. त्याचा साथीदार इम्रान अन्सारी तसेच नायजेरियन नागरिक उबा चिन्सो विझडोम, याला नालासोपारा येथून अटक केली तो एमडीचा मुख्य पुरवठा करणारा होता. त्याच्याकडील माहितीतून एनसीबीने नवचिसीओ इस्राल नवाचूवू ऊर्फ सॅमला मंगळवारी सकाळी आरे कॉलनी येथून अटक केली. तो गेल्या ५ वर्षापासून कोकेनची मुंबईत तस्करी करीत असून, दक्षिण अमेरिकन कोकेनची आयात करीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
एनसीबीच्या पथकाने संडे ओकेकी ऊर्फ सनी या नायजेरियन नागरिकाला नालासोपारा येथून अटक केली. तो काही अभिनेत्याकडे बॉडीगार्ड व बाउन्सर म्हणून काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.