Join us  

अर्जुन रामपालच्या मेहुण्याला क्रिकेट सट्टेबाजीप्रकरणी बेड्या,  ३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 1:10 AM

मुंबईत क्रिकेट सट्टेबाजीप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ९ने अभिनेता अर्जुन रामपाल याच्या मेहुण्याला बुधवारी अटक केली. भारत, आॅस्ट्रेलिया दरम्यानच्या क्रिकेट मालिकेवर सट्टेबाजी करताना ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईत क्रिकेट सट्टेबाजीप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ९ने अभिनेता अर्जुन रामपाल याच्या मेहुण्याला बुधवारी अटक केली. भारत, आॅस्ट्रेलिया दरम्यानच्या क्रिकेट मालिकेवर सट्टेबाजी करताना ही कारवाई करण्यात आली आहे. अमित अजित गील असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला ३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या अटकेनंतर ठाणे आणि भांडुपमधून क्रिकेट सट्टेबाजांवर कारवाई करण्यात आली. गेल्या महिन्यात आॅगस्टमध्ये अंधेरीतून सहा सट्टेबाजांना गुन्हे शाखेने अटक केली होती. आरोपींमध्ये दीपक कपूर, तरुण ठाकूी, सन्नी ठाकूर, नितीश खेतलाजी, निखिल गणात्रा, आशिष शर्मा यांचा समावेश होता. गील हा कपूरच्या संपर्कात होता. तपासात गीलचा सहभाग समोर येताच बुधवारी त्याला सांताक्रुझच्या राहत्या घरातून अटक केली. गील हा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल याचा मेहुणा आहे.गीलने सट्टेबाजांना किती पैसे पुरविले? तो त्यांच्या संपर्कात कसा आला? अशा अनेक प्रश्नांबाबत त्याची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. आरोपी विशेषत: ‘बिंगो’ नावाचे सॉफ्टवेअर वापरत होते, ज्याचे सर्व्हर नेदरलँडच्या हॉलंडवर आधारित होते. सट्टेबाजांनी त्यांचे लिखित रेकॉर्ड ठेवलेले नाहीत. पोलिसांना ते मिळू नयेत म्हणून ते या सॉफ्टवेअरचा वापर करत होते.गीलबाबत अधिक चौकशी करण्यासाठी गरज पडल्यास रामपालकडेही चौकशी करण्यात येईल, असे गुन्हे शाखेने सांगितले.

टॅग्स :गुन्हा