Join us  

मुंबई विद्यापीठातील अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या संचालकपदाची नियुक्ती संशयाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 7:24 AM

मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स विभागाच्या संचालकपदाच्या नियुक्तीत गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

मुंबई  - मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स विभागाच्या संचालकपदाच्या नियुक्तीत गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केली आहे. सध्याची नियुक्ती अवैध असून, विद्यापीठाने ती रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छात्रभारती संघटनेने दिला आहे. या संदर्भात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना त्यांनी पत्र लिहिले आहे.

डॉ. मंगेश बनसोड हे साडेतेरा वर्षे याच विभागात वरिष्ठ सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. यापैकी विभागाचे प्रभारी संचालक म्हणून गेल्या साडेतीन वर्षांपासून ते कार्यरत होते. चार वर्षे संशोधनाचा मिळून त्यांना १७ वर्षांचा अनुभव आहे. विद्यापीठाने १२ मार्च रोजी संचालक पदाच्या मुलाखती आयोजित केल्या. मात्र, त्यांना मुलाखतीसाठी डावलून योगेश सोमण यांची संचालक पदावर वर्णी लावली असा आरोप छात्रभारतीने केला. तसेच तत्काळ ही नियुक्ती रद्द करण्याची मागणी छात्रभारतीने केली आहे.

विद्यापीठाने बनसोड यांना प्रत्यक्ष मुलाखतीस बोलाविले नसल्याने, त्यांनी राज्य मागासवर्गीय आयोगाकडे धाव घेतली. आयोगाने त्यांचे म्हणणे ऐकून घेत, प्रत्यक्ष मुलाखतीसाठी डॉ. बनसोड पात्र असताना त्यांना नैसर्गिक न्यायापासून वंचित ठेवण्यात आल्याचे ताशेरे मुंबई विद्यापीठावर ओढले. विद्यापीठ प्रशासनाला याबाबत आदेश देत डॉ. बनसोड यांना प्रत्यक्ष मुलाखतीस बोलविण्यास सांगितले. त्यानंतर, विद्यापीठाने डॉ. बनसोड यांना मुलाखतीस बोलाविले आणि त्यांची मुलाखत घेतली गेली. त्यामुळे आधीच ठरवून दिलेल्या उमेदवाराला मुंबई विद्यापीठाने नियुक्ती दिल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख यांच्याशी संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही....तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल

डॉ. मंगेश बनसोड यांच्यावर झालेला हा बौद्धिक अत्याचार आहे. नियुक्तीत गैरप्रकार झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाने नियुक्ती रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. - सचिन बनसोड, अध्यक्ष, छात्रभारती

टॅग्स :मुंबईमुंबई विद्यापीठ