Join us

‘एबीसी आयडी’ १५ दिवसांत काढा, कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 11:50 IST

असे काढा श्रेयांक बँक खाते

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विद्यापीठामध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४चे प्रवेश सुरू असून या वर्षात नवीन शैक्षणिक धोरण सुरू होत आहे. यासाठी ‘एबीसी आयडी’ (शैक्षणिक श्रेयांक बँक खाते) महत्त्वाचा आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा ‘एबीसी आयडी’  प्रवेशानंतर १५ दिवसांत काढावा, असे आवाहन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केले आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या श्रेयांक आराखड्यानुसार विद्यार्थ्यांनी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सची (एबीसी) नोंदणी करणे आवश्यक आहे.  ‘एबीसी आयडी’ तयार करताना विद्यार्थ्यांचा भ्रमणध्वनी आधारशी जोडला नसल्यामुळे काही  विद्यार्थ्यांना ‘एबीसी आयडी’  तयार करताना अडचणी येत असल्याचे विद्यापीठास आढळून आले आहे. यासाठी संबंधित महाविद्यालयांनी प्रवेशाच्या शेवटच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ‘एबीसी आयडी’ तयार करून हा अचूक डेटा विद्यापीठास सादर करावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

असे काढा श्रेयांक बँक खाते

  • विद्यार्थ्यांनी www.abc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर ‘माय अकाउंट’वर क्लिक करून ‘स्टुडंट’ हा पर्याय निवडावा. 
  • नवीन वापरकर्त्यांनी ‘साइन अप फॉर मेरी पहचान’ या पर्यायावर क्लिक करावे. यानंतर तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी प्राप्त होईल.
  • मग सर्व आवश्यक माहिती भरावी आणि ‘व्हेरिफाय’या बटनावर क्लिक करावे. ही संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर विद्यार्थ्याला शैक्षणिक श्रेयांक बँक खाते क्रमांक (‘एबीसी आयडी’) प्राप्त होईल. 
टॅग्स :मुंबई विद्यापीठ