Join us  

स्वच्छता आणि आरोग्य जपा, मुंबईकरांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 4:12 AM

अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणारा मुंबापुरीचा गणेशोत्सव, आता नाही म्हटले तरी सुरू झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे मंडपात आगमन झाले असून, शुक्रवारी घरगुती गणेशमूर्ती विराजमान होणार आहेत.

मुंबई : अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणारा मुंबापुरीचा गणेशोत्सव, आता नाही म्हटले तरी सुरू झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे मंडपात आगमन झाले असून, शुक्रवारी घरगुती गणेशमूर्ती विराजमान होणार आहेत.एकंदर गणेशोत्सवाने मुंबापुरी भारावून गेली असतानाच, ‘स्वच्छता आणि आरोग्य’ तेवढेच महत्त्वाचे आहे. विशेषत: साथीच्या आजाराचा महत्त्वाचे म्हणजे, लेप्टोस्पायरोसिससारखा आजार उत्सव काळात डोके वर काढू नये, म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाचा परिसर स्वच्छ राखणे अत्यंत गरजेचे आहे. यावर सारासार विचार करत, मुंबई महापालिकेने मुंबईकरांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव काळात ‘स्वच्छतेसह आरोग्य जपा’ असे आवाहन केले आहे. हेच आवाहन करताना, ‘पर्यावरण संतुलित ठेवण्याची जबाबदारी आता आपण सर्व मुंबईकरांची आहे...’ असे म्हणत, महापालिकेने नागरिकांना पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करावा, अशी कळकळीची विनंती केली आहे. अशाच काहीशा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्वच्छतेसह आरोग्याबाबतचे निर्देश दिले असून, अशाच काहीशा निर्देशांसह सूचनांचा ‘लोकमत’ने आढावा घेतला आहे. दरम्यान गणेशोत्सवासाठी मुंबईबाहेरील भाविकही येथे दाखल होत असून यात वरचेवर भर पडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.गणेशोत्सवाच्या काळात मावा आणि माव्याच्या पदार्थांची खरेदी केली जाते. जर हे पदार्थ शिळे असतील, तर पदार्थांच्या सेवनामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे असे पदार्थ खरेदी करताना, ताजे व खाण्यास योग्य आहेत, हे तपासूनच त्याची खरेदी करावी किंवा त्याचे वाटप करावे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर फेरीवाले खाद्यपदार्थांची विक्री करतात, त्यास प्रतिबंध करावा. याबाबतीत काही मदत लागल्यास संबंधित विभागातील वरिष्ठ निरीक्षकांशी संपर्क साधावा.मंडपात भाविकांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत विशेष जागरूक असावे. पोलिसांनी सहकार्य करावे, प्रत्येक मंडळाने गणेशोत्सवाच्या कालावधीत तयार होणारे निर्माल्य व तत्सम पदार्थ साठवून ठेवण्यासाठी व्यवस्था करावी. ज्या पदार्थापासून खत तयार करता येणे शक्य नाही, असे पदार्थ वेगळ्या डब्यात जमा करावे, प्रत्येक मंडळाने आपल्या आजूबाजूच्या परिसरातील घरगुती आणि इतर गणेशोत्सव मंडपामध्ये संकलित होणारे निर्माल्य, महापालिकेच्या निर्माल्य वाहनाकडे हस्तांतरित करावे.जेथे महापालिकेची गाडी पोहोचू शकत नसेल, तेथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने वा इतर गणेशोत्सव साजरा करणाºया लोकांनी एकत्र येत निर्माल्य अशा ठिकाणी संकलित करावे की, जेथून ते महापालिकेच्या वाहनामार्फत वाहून नेणे सोईस्कर होईल, प्रत्येक मंडपातील, तसेच मंडपाच्या आजूबाजूच्या परिसरातील निर्माल्य गोळा करून त्याचे वर्गीकरण करावे.गणेश पूजनासाठी मुहूर्तघरी गणेशमूर्ती आणण्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची जरूरी नाही. श्रीगणेशाची स्थापना व पूजन करण्यासाठी २५ आॅगस्ट रोजी प्रात:कालपासून मध्यान्ह समाप्तीपर्यंत म्हणजे, दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत शुभ वेळ असल्याचे, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या वर्षी पाचव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याच्या दिवशी मंगळवार येत आहे. तरी त्याच दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. गणेशमूर्ती विसर्जनाचा आणि मंगळवारचा काहीही संबंध नसल्याचेही सोमण यांनी स्पष्ट केले.बाजारपेठांमध्य खरेदी-विक्रीला उधाण- गणेशोत्सवानिमित्त खरेदीला उधाण आल्याचे चित्र शहरातील सर्वच प्रमुख बाजारपेठांसह लहान-मोठ्या बाजारांमध्ये पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या आगमनासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे.- बाप्पाच्या पाहुणचारामध्ये कोणतीही कसर राहायला नको, यासाठी सजावटीचे साहित्य, बाप्पाचे दागिने, पोशाख, मखरे खरेदी करण्यासाठी मुंबईकरांची बाजारांमध्ये लगबग पाहायला मिळत आहे. शुक्रवारी बाप्पांचे आगमन होणार असल्याने, गुरुवार हा खरेदीसाठी शेवटचा दिवस असल्याने, मुंबईकरांची तारांबळ उडणार आहे.- बाप्पाच्या स्वागतासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच लोक तयारी करण्यात व्यस्त आहेत. लहान मुलांचे नवीन कपडे घेण्यासह सजावटीचे साहित्य घेण्यासाठी मोठ्यांची बाजारांमध्ये गर्दी होत आहे. गणेशोत्सवात मुंबईतील बाजारपेठांमध्ये करोडो रुपयांची उलाढाल होते. मागील दोेन-तीन आठवड्यांपासून ही उलाढाल सुरू झाली आहे.- मुंबई शहरातील लालबाग, दादरसह पूर्व उपनगरातील घाटकोपर, भांडुप, मुलुंड आणि पश्चिम उपनगरातील अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी, बोरीवली येथील बाजारपेठांमध्ये गणेश उत्सवासाठीच्या साहित्याची खरेदी करण्याकरिता नागरिकांची गर्दी होत आहे. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी वाहतूक पोलीसही मदत करत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहण्यास मिळत आहे.मंडळांनो, या गोष्टींचीघ्या काळजी- सार्वजनिक आरोग्याबाबात प्रत्येकाने आपल्या विभागात उंदीर, डासांची उपद्रव होणार नाही, याची काळजी घ्यावी. जेणेकरून, लेप्टोस्पायरोसिस व इतर साथीच्या आजारांचा फैलाव होणार नाही.- मोकळ्या जागेवरील माती, कचरा काढून घेण्याची काळजी घ्यावी. जेणेकरून, गणेशोत्सवाच्या कालावधीत संपूर्ण स्वच्छता राखली जाईल आणि आरोग्यास धोका निर्माण होणार नाही.- प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने मंडपाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे आवश्यक आहे, तसेच त्यांनी आवश्यकतेनुसार कचरा साठविण्याची वेगळी व्यवस्था करावी.- संपूर्ण विभाग व विशेष करून मंडपाच्या बाजूचा परिसर, रस्ते आणि विसर्जनाची ठिकाणे स्वच्छ ठेवावीत.- श्रीगणेशाच्या दर्शनाला येणाºया भक्तांच्या रांगेची व्यवस्था करणे, हे मंडळाचे काम राहील. यामध्ये वाहतूक, पादचारी आणि इतरांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. रांगेच्या भागात योग्य त्या ठिकाणी कचरा साठविण्याची सोय करणे आवश्यक आहे. मंडळाच्या ठिकाणी होणाºया ध्वनिप्रदूषणाची जबाबदारी मंडळाची राहील.- मंडपात, तसेच मंडपाच्या आजूबाजूच्या परिसरात महापालिकेने तयार केलेली लोकपयोगी भित्तिपत्रके, कापडी फलक, तसेच समजापयोगी माहितीपत्रके प्रदर्शित करावीत.- मंडपाच्या परिसरात आग विझविण्यासाठी सहज उपलब्ध होईल, अशा रितीने रेतीच्या बादल्या व पाण्याची व्यवस्था करावी. मंडपाजवळील अग्निशमन केंद्राचा संपर्क क्रमांक मंडळातील जबाबदार कार्यकर्त्याकडे असावा. मंडपामुळे होणारे खड्डे उत्सवानंतर बुजविण्याची जबाबदारी मंडळाची राहील.

टॅग्स :गणेशोत्सव