Join us  

चर्चेअभावी अ‍ॅप बेस्ड टॅक्सी संप कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 4:39 AM

टॅक्सी चालक-मालकांची दिवाळी अंधारात; ओला-उबरविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणार

मुंबई : दिवाळीपूर्वी मागण्या मान्य होऊन संप मिटेल अशी आशा असलेल्या हजारो अ‍ॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांचा अपेक्षाभंग झाला आहे. गुरुवारी दुपारी चर्चेपूर्वीच ओला-उबर व्यवस्थापनाने पळ काढल्याने चर्चा होऊ शकली नाही. यामुळे शहरातील टॅक्सी संप कायम राहणार असून अ‍ॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांची यंदाची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे चित्र आहे.सुमारे ८० टक्के मागण्या मान्य झाल्यानंतर २० टक्के मागण्यांच्या चर्चेसाठी गुरुवारी दुपारी ओला-उबर व्यवस्थापनाने अंधेरीत चर्चेची तयारी दर्शवली होती. मात्र चर्चेपूर्वीच ओला पदाधिकारी बंगळुरू तर उबर पदाधिकारी दिल्लीला गेले. व्यवस्थापनाच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनादेखील भेटण्यास टाळाटाळ केली. व्यवस्थापनाविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी सांगितले.परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन संपावर तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र सरकारने या प्रश्नाकडे पाठ फिरवली. दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसात मुंबईकरांचे हाल होत असताना सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप संघाने केला आहे.‘५ नोव्हेंबरला मोर्चा काढणार’सुमारे ५० हजार अ‍ॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांचा २२ आॅक्टोबरपासून संप सुरू आहे. येत्या दोन दिवसांत सरकारने तोडगा काढण्याचा अल्टिमेटम संघाने दिला. अन्यथा दिवाळीत ५ नोव्हेंबरला लालबाग ते मंत्रालय पायी धडक मोर्चा काढून मंत्रालयाला घेराव घालणार असल्याची माहिती संघाने दिली.

 

टॅग्स :ओलाउबरमुंबईसंप