Join us

एपीएमसीत अनधिकृत वाहन पार्किंग

By admin | Updated: September 13, 2014 01:58 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये रात्री अनधिकृतपणे वाहने उभी केली जात आहेत.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये रात्री अनधिकृतपणे वाहने उभी केली जात आहेत. या अनधिकृत वाहनतळाकडे सुरक्षा विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून यामुळे बाजार समितीची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बेशिस्तपणा वाढू लागला आहे. येथे ७२ हेक्टर जमिनीवर कांदा- बटाटा, मसाला, धान्य, भाजी, फळ व विस्तारित भाजीपाला मार्केट बांधण्यात आले आहे. वर्षाला साडेबारा हजार कोटींची उलाढाल होणाऱ्या बाजारपेठेच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन असून बाजार समितीची स्वत:ची सुरक्षा व्यवस्था आहे. सुरक्षा रक्षक मंडळाचे कर्मचारीही एपीएमसीच्या सेवेत आहेत. पुरेशी यंत्रणा असताना बेशिस्तपणामुळे मार्केटची सुरक्षा धोक्यात आली आहे. नियमाप्रमाणे मार्केटमध्ये धान्य घेवून येणारी वाहने माल खाली झाला की मार्केटच्या बाहेर गेली पाहिजेत. स्थानिक बाजारपेठेत माल घेऊन जाणाऱ्या वाहनांना रात्री मार्केटमध्ये थांबण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु या व्यतिरिक्त दोनशे ते तीनशे ट्रक रात्री अनधिकृतपणे मार्केटमध्ये उभे केले जात आहेत. रात्री गेटवरील कर्मचारी व सुरक्षा रक्षक ट्रकना मार्केटमध्ये प्रवेश देत आहेत. रात्री ही वाहने मार्केटमधील मोकळ्या जागेत उभी केली जातात. अनेक ट्रकचालक येथेच स्टोव्हवर स्वयंपाक करत असतात. सकाळी सर्व वाहने बाहेर काढली जातात. पूर्णपणे बेकायदेशीरपणे व नियम धाब्यावर बसवून मार्केटचे वाहनतळ बनविण्यात आले आहे. सुरक्षा विभागाच्या अनागोंदी कारभाराकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. सभापतींसह सचिवांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे मार्केटची सुरक्षा धोक्यात आली आहे. एखादी घातपाती कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी अशाप्रकारचे पार्किंग बंद करण्यात आले होते. परंतु मागील काही महिन्यांपासून हा व्यवसाय तेजीत आला आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी सचिव सुधीर तुंगार यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा फोन बंद होता. (प्रतिनिधी)