Join us

एपीएमसीत २५ टन बटाटा सडला

By admin | Updated: April 1, 2015 00:24 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी पाठविलेला बटाटा सडू लागला आहे. दोन दिवसांमध्ये जवळपास २५ टन माल खराब झाला

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी पाठविलेला बटाटा सडू लागला आहे. दोन दिवसांमध्ये जवळपास २५ टन माल खराब झाला. बदललेल्या वातावरणामुळे सडल्याचा दावा व्यापा-यांनी केला आहे. तर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देवून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणीही शेतकरी प्रतिनिधींनी केली आहे. दरम्यान सडलेल्या मालामुळे मार्केटमध्ये दुर्गंधी पसरली असून, येथे काम करणाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासूून बाजार समितीमध्ये बटाट्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २७ व २८ मार्चला ११२ ट्रकची आवक झाली. ३० मार्चला १०५ ट्रकची आवक झाली आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व गुजरातमधून माल विक्रीसाठी याठिकाणी येत आहे. आवक वाढल्यामुळे मालाची विक्री झालेली नाही. हलक्या दर्जाचा बटाटा १ रुपया ते ४ रुपये किलो दराने विकला जात आहे. चांगल्या दर्जाचा मालही ४ ते ८ रुपये किलो दराने होलसेल मार्केटमध्ये विकला जात होता. विक्रीसाठी पाठविलेला जवळपास २५ टनपेक्षा जास्त माल फेकून द्यावा लागला आहे. गोणीमध्येच माल सडू लागला आहे. लिलावगृहामध्ये ३०० ते ४०० पिशव्या बटाटा ठेवण्यात आला आहे. गोणीमधून पाणी बाहेर येवू लागले असून मार्केटमध्ये दुर्गंधी पसरली आहे. मार्केटमध्ये अनेक ठिकाणी बटाट्याच्या गोण्या उभ्या केल्या आहेत. प्रशासनाकडून मालाचा पंचनामा करण्यास सुरवात केली आहे. पंचनामा करून माल कचरा कुंडीमध्ये फेकण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शेतमालाची वेळीच विक्री का झाली नाही या नुकसानीला जबाबदार कोण, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. माल सडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेच, शिवाय गाडीभाडेही खिशातून देण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)