Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ निरीक्षकासह एपीआय गजाआड

By admin | Updated: May 31, 2015 01:55 IST

पाच लाखांची लाच मागणारे खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय जाधव यांना शुक्रवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

मुंबई : फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पालिका अधिकाऱ्याकडे पाच लाखांची लाच मागणारे खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय जाधव यांना शुक्रवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या फरार एपीआय दिलीप इंगळे यालासुद्धा शनिवारी एसीबीने अटक केली आहे.पनवेल येथे राहणारे रामचंद्र चव्हाण हे मुंबई महापालिकेत भाडेवसुली साहाय्यक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. वर्षभरापूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यासह इतर तीन जणांवर खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यामध्ये पोलिसांनी चव्हाण यांच्या तीन साथीदारांना अटक केली होती. मात्र चव्हाण यांना अटक झालेली नसल्याने २४ एप्रिलला त्यांना खेरवाडी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव आणि एपीआय इंगळे यांनी त्यांना अटक न करण्यासाठी पाच लाखांची लाच मागितली. तडजोडीनंतर त्यांनी दीड लाख घेण्याचे मान्य केले. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जाधव यांना शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. त्यानंतर शनिवारी साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप इंगळे याच्या बोरीवली येथील पोलीस वसाहतीमध्ये झडती सुरू असताना काही वेळासाठी तो घराच्या बाहेर गेला. मात्र दीड तास लोटल्यानंतरदेखील तो घरी न परतल्याने एसीबीकडून त्याला फरार घोषित करण्यात आले होते. मात्र काही वेळानंतर तो स्वत:हूनच घरी आल्यानंतर एसीबीने त्यालादेखील बेड्या ठोकल्या आहेत. (प्रतिनिधी)लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जाधव यांना शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. शनिवारी सहा. पोलीस निरीक्षक दिलीप इंगळे याच्या बोरीवली येथील पोलीस वसाहतीतील घरातून अटक केली.