ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ५ - देशातील जनता महागाईने त्रस्त झालेली असतानाच, 'या शहरात लोक अजूनही ५ रुपयांत पोट भरू शकतात', असे वक्तव्य भाजप नेत्याने केले आहे. भारतीय जनता पक्षाचे आशीष शेलार यांच्या म्हणण्यानुसार मुंबईत कोणीही माणूस अवघ्या पाच रुपयांत पोटभर खाऊ शकतो. विषेश म्हणजे याच शेलार यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस नेत्यांच्या अशी स्वरुपाच्या वक्तव्यावर कठोर प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, शेलार यांनी आपल्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगत वादग्रस्त विधान केले नसल्याची प्रतिक्रिया लेकमतकडे व्यक्त केली आहे.
भाजपच्या पदाधिका-यांच्या बैठकीदरम्यान शेलार यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, 'हे मुंबई शहर आहे, जिथे एकीकडे मोठमोठी रेस्टॉरंट्स आहेत, ज्यात महागडे पदार्थ मिळतात. तर दुसरीकडे याच शहरात अवघ्या पाच रुपयांत पोट भरता येऊ शकतं.
शेलार यांच्या या वक्तव्यावरून चर्चा सुरू झाल्यावर मात्र त्यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे ते म्हणाले. मुंबईत श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब सर्व त-हेचे लोक राहतात, एवढेच आपल्याला सांगायचे होते, असे ते म्हणाले. मात्र ५ रुपयांत कोठे जेवण मिळते, असा प्रश्न त्यांना विचारला असता, माहिमच्या दर्ग्यात गरीबांना २ ते ५ रुपयांत जेवण मिळते, असे त्यांनी सांगितल्याची चर्चा माध्यमांमध्ये होती. मात्र, माहिमच्या दर्ग्याचा उल्लेख आपण केला नसल्याचेही शेलार म्हणाले. आपल्या तोंडी प्रसारमाध्यमांनी काही शब्द घुसडल्याचा दावा त्यांनी केला आहे.