Join us  

कोणत्याही परिस्थितीत आरेचं जंगल वाचविणारच; तेजस ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 8:02 AM

124 जागा आम्ही लढवतोय असं नाही तर आम्ही महायुतीत निवडणुका लढवित आहोत

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्ष प्रचारात गुंतलेला आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरेही सध्याही भाऊ आदित्य ठाकरेच्या प्रचारात उतरला आहे. आदित्यच्या प्रचारासाठी तेजस वरळीतील रॅलीत सहभागी झाला. यावेळी त्याने माध्यमांशी प्रतिक्रिया साधताना येत्या 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात भगवा फडकेल असा विश्वास ठामपणे व्यक्त केला. 

यावेळी आरेबाबत बोलताना तेजस ठाकरे म्हणाले की, आरेमध्ये मी किती वर्ष फिरतो, माझं काम तिथे सुरु आहे, पक्षप्रमुखांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आरे कोणत्याही परिस्थितीत वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. माझ्यासारखे अनेक वन्यजीव प्रेमी या लढाईत एकत्र आहोत. तसेच वन्यजीव संशोधनात माझं नाव महत्वाचं नसून माझ्यामुळे सह्याद्रीच्या रांगांना संरक्षण आणि त्याठिकाणी लक्ष केंद्रीत होत असेल तर ते महत्वाचं आहे असं सांगितले. 

तसेच 124 जागा आम्ही लढवतोय असं नाही तर आम्ही महायुतीत निवडणुका लढवित आहोत. वरळीत सर्वाधित मताधिक्याने आदित्य ठाकरे निवडून येणार आहेत. मी सध्या राजकारणात नाही, जे जे शिवसैनिक महाराष्ट्रात फिरतात हे प्रेम असचं राहू द्या. येत्या 24 तारखेला महाराष्ट्रात भगवा फडकणार आहे असा विश्वासही तेजस ठाकरेंनी व्यक्त केला. 

दरम्यान, माझं वन्यजीवांवर संशोधन सुरु आहे, प्रत्येकाने आपापल्या परिने समाजासाठी काम केलं पाहिजे. निवडणुका सारख्या सुरुच असतात, नगरपालिका, महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा प्रत्येकवेळी निवडणुकीचं वातावरण कुटुंबात नसतं, मनमोकळ्या गप्पा आम्ही कुटुंबात मांडतो असंही तेजस ठाकरेंनी सांगितले. 

तेजस ठाकरे हे सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजकीय व्यासपीठावर दिसून येतात. आदित्य ठाकरे निवडणुकीची घोषणा करतानाही ते व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे येणाऱ्या काळात तेजस ठाकरेही राजकीय मैदानात उतरणार का? अशीच चर्चा सगळीकडे सुरु आहे. खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी तेजस ठाकरे हे त्यांच्या स्वभावाचे आहेत. तेजसचा उल्लेख करताना बाळासाहेबांनी तोडफोड सेना म्हणून केला होता. त्यामुळे तेजस ठाकरेंविषयी शिवसैनिकांच्या मनातही उत्सुकता आहे.  

टॅग्स :आरेशिवसेनाराजकारण