Join us

लॉकडाउनमुळे उत्पन्न ठप्प झाल्याने पालकांसमोर फी भरण्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 04:37 IST

आगामी वर्गात प्रवेशासाठी वर्षाचे शुल्क भरण्याचे पत्र शाळा व महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांकडे येऊ लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जागतिक कोरोनाच्या साथीने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठी आर्थिक चणचण भेडसावत आहे. त्यातच आगामी नवीन शैक्षणिक वर्गात प्रवेशासाठी वर्षाचे शुल्क भरण्याचे पत्र शाळा व महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांकडे येऊ लागले आहे.

गेल्या २४ मार्चपासून लोकडाउनमध्ये आर्थिक उत्पन्न ठप्प झाले असताना आता विद्यार्थ्यांचे वार्षिक शुल्क कसे भरायचे या चिंतेत तमाम पालकवर्ग आहे. अशा परिस्थितीत पालकांकडून फी मागणे हे एक अतार्किक पाऊल आहे.त्यामुळे राज्य सरकारने शैक्षणिक संस्थांच्या संचालकांना विद्यार्थ्यांना फी सवलत देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मुंबई भाजपचे सरचिटणीस अमरजीत मिश्रा यांनी राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना एका पत्राद्वारे केली आहे.

आगामी वर्गात प्रवेशासाठी वर्षाचे शुल्क भरण्याचे पत्र शाळा व महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांकडे येऊ लागले आहे. जेव्हा भाडेकरूंना उशिरा भाडे घेण्याची विनंती सरकार जमीनमालकांना करीत आहे, तेव्हा राज्य सरकारच्या अनुदानाचा फायदा घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा सामाजिक धर्म म्हणजे विद्यार्थ्यांना पुढील वर्षाच्या शुल्कामध्ये सवलत द्यावी आणि एकाच वेळी संपूर्ण वर्षासाठी फीची मागणी करू नये. त्यांना हप्त्यांमध्ये फी भरण्याची मुभा द्यावी. शिक्षण हा भार म्हणून नव्हे तर वरदान म्हणून देण्यात यावा, असे अमरजीत मिश्रा म्हणाले.शिक्षणमंत्र्यांना सरकारी व खासगी शैक्षणिक संस्थांना सवलती देण्याचे आदेश देऊन दिलासा देण्याची विनंती पालकांनी केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना यासंदर्भात मदत करण्याची विनंती शेवटी त्यांनी केली आहे.