Join us
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणानंतर प्रतिपिंड चाचणीची आवश्यकता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:08 IST

लसीकरणानंतर प्रतिपिंड चाचणीची आवश्यकता नाहीनायर रुग्णालयात लसीकरणानंतर निर्माण होणाऱ्या प्रतिपिंडांविषयी तज्ज्ञांचे संशोधन सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ...

लसीकरणानंतर प्रतिपिंड चाचणीची आवश्यकता नाही

नायर रुग्णालयात लसीकरणानंतर निर्माण होणाऱ्या प्रतिपिंडांविषयी तज्ज्ञांचे संशोधन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर प्रतिपिंड चाचणीसाठी नागरिक गर्दी करत असल्याचे समोर येत आहे. यात काही वैद्यकीय प्रयोगशाळा खोटे अहवाल देऊन नागरिकांना दिलासा देत आहेत. मात्र, लसीकरणानंतर शरीरातील प्रतिपिंड चाचणीची आवश्यकता नसल्याचे मत कस्तुरबा रुग्णालयाचे डॉ. जयंती शास्त्री यांनी मांडले आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मागील वर्षी कस्तुरबा रुग्णालयातील वैद्यकीय प्रयोगशाळेत पहिल्यांदा कोरोना चाचणीला सुरुवात करण्यात आली. त्यात मोलाचा वाटा डॉ. शास्त्री यांचा होता. लसीकरणानंतर प्रतिपिंड चाचणीच्या आवश्यकतेविषयी डॉ. शास्त्री यांनी सांगितले, लसीकरणानंतर दोन प्रकारचे प्रतिपिंड शरीरात निर्माण होतात. वैद्यकीय संज्ञेत त्यांना न्यूट्रिलाइज अँटिबॉडीज आणि न्यूक्लियोकॅप्सिड अँटिबॉडीज यांचा समावेश आहे. सध्या लसीकरणानंतर लाभार्थींच्या शरीरात ४-५ आठवड्यांनंतर न्यूट्रिलाइज अँटिबॉडीज तयार होतात, गंभीर संसर्गाविरोधात या संरक्षण करतात, नव्या स्ट्रेनविरोधातही ही प्रतिपिंड उत्तम काम करत आहेत; परंतु अजूनही किती प्रमाणात ही प्रतिपिंड निर्माण होतात याविषयी संशोधन सुरू आहे.

नायर रुग्णालयात नुकतेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शरीरात लसीकरणानंतर प्रतिपिंड चाचणीविषयीचे संशोधन करण्यात आले. यात ६० जणांचा समावेश करण्यात आला, तीन आठवड्यांनंतर त्यांच्या शरीरातील प्रतिपिंडाच्या चाचण्या केल्या. तसेच कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसनंतरही पुन्हा चाचण्या करण्यात आल्या. यात साठही जणांच्या शरीरात वेगवेगळ्या प्रमाणात न्यूट्रिलाइज अँटिबॉडीज तयार झाल्या होत्या, हे संशोधन या दृष्टिकोनातून खूपच आश्वासक आहे. अशा स्वरूपाचे संशोधन कोव्हॅक्सिन घेतलेल्या लाभार्थींचेही करण्यात येणार आहे.

प्रतिपिंड चाचणी करू नये!

प्रतिपिंड चाचणी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये, हे विश्वासार्ह नाही. या चाचण्यांमधून ठोसपणे न्यूट्रिलाइज अँटिबॉडीजचे प्रमाणही समजत नाही. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी सुरक्षित असून यांचे डोस घेतल्यानंतर शरीरात प्रतिपिंडाची निर्मिती होते, असे जागतिक स्तरावरही संशोधनातून दिसून आले आहे. त्यामुळे सध्या लसीकरणानंतर नागरिकांनी प्रतिपिंड चाचणी करून घेण्यासाठी गर्दी करू नये, बऱ्याचदा यात वैद्यकीय प्रयोगशाळांमार्फत फसवणुकीची शक्यताही अधिक आहे.