Join us

...अन् ठग बनला दिग्दर्शक राजकुमार हिरानींचा मुलगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:06 IST

इन्स्टाग्रामवर चित्रपटाची जाहिरात देत थेट सुरू केले ऑडिशनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली. नवोदित ...

इन्स्टाग्रामवर चित्रपटाची जाहिरात देत थेट सुरू केले ऑडिशन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली. नवोदित कलाकारांनाही याचा फटका बसला आहे. याचाच गैरफायदा घेत ठगाने दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा मुलगा असल्याचे भासवून थेट, इन्स्टाग्रामवर आगामी चित्रपटासाठी जाहिरात देत ऑडिशनच्या नावाखाली फसवणूक सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बाब हिरानी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

आर. एच. फिल्मस् एल.एल.पी.चे व्यवस्थापक दिलीप नारायण देसाई (५८) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यात, २ जुलै रोजी त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर आलेल्या मेलमध्ये राजकुमार हिरानी यांचा मुलगा कबीर यांच्या नावाने सुरू असलेल्या ऑडिशनच्या जाहिरातीबाबत विचारणा करण्यात आली. त्यांनी वरिष्ठांंना याबाबत सांगून तात्काळ चौकशी केली असता, अनोळखी व्यक्तीने स्वतःचे इन्स्टाग्राम खाते हे कबीर हिरानी या नावाने सुरू करून तो स्वतः राजकुमार हिरानी यांचा मुलगा असल्याचे खोटे सांगितले. तसेच राजकुमार हिरानी हे टिनएज सिनेमा करीत असल्याची खोटी जाहिरात इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रसिद्ध करत, सिनेमासाठी इच्छुक असलेल्या तरुण, तरुणींना संपर्क साधण्यास सांगितले. यात हिरानी यांच्या नावासह त्यांच्या कंपनीच्या नावाचा आणि ठिकाणाचाही वापर करण्यात आला होता. हा फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच कंपनीकडून तात्काळ अंधेरी पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यानुसार बुधवारी गुन्हा नोंदवत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यात फसवणूक झालेल्या व्यक्तीनींही तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.