Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ प्रश्नांची मिळणार उत्तरे

By admin | Updated: January 20, 2016 02:22 IST

पौगंडावस्थेपासून तरुण वयापर्यंत मुला-मुलींना आरोग्याविषयी, शरीरात होणाऱ्या बदलांविषयी अनेक प्रश्न पडतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी इंटरनेट, मित्र-मैत्रिणी, ‘कुठली’तरी

मुंबई : पौगंडावस्थेपासून तरुण वयापर्यंत मुला-मुलींना आरोग्याविषयी, शरीरात होणाऱ्या बदलांविषयी अनेक प्रश्न पडतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी इंटरनेट, मित्र-मैत्रिणी, ‘कुठली’तरी पुस्तके असले पर्याय निवडले जातात. त्यातून मिळणाऱ्या अपूर्ण माहितीमुळे मनाचा गुंता वाढतो. योग्य, शास्त्रीय आणि परिपूर्ण माहिती देण्यासाठी मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था आणि कामा रुग्णालय यांनी संयुक्तपणे मुंबईतील पहिले ‘अर्श क्लिनिक’ (युवा प्रजनन व लैंगिक आरोग्य केंद्र) सुरू केले आहे. त्यामुळे तरुणाईत प्रवेश करताना ‘त्या’ सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कामा रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर मंगळवारी ‘अर्श क्लिनिक’चे उद्घाटन करण्यात आले. या वेळी मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. श्रीकला आचार्य आणि कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री कटके उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थीही उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. १५ ते २५ वयोगटातील मुलांना अनेक प्रश्न पडतात. त्यातच अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. योग्य माहिती कशी मिळवावी हे माहीत नसते. त्यातूनच असुरक्षित शारीरिक संबंध ठेवले जातात आणि एचआयव्हीची लागण होण्याचा धोका उद्भवतो. हे सहज टाळता येऊ शकते, असे डॉ. कटके यांनी सांगितले. डॉ. कटके पुढे म्हणाल्या, मुलांना योग्य ती माहिती देण्यासाठी ‘अर्श क्लिनिक’ची स्थापना करण्यात आली आहे. यात महाविद्यालयातील मुलांशी संवाद साधण्यात येणार आहे. त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यात येतील. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यावर अन्य विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याची जबाबदारी टाकली जाईल.मुलांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण कमी असल्याने ते डॉक्टरांकडे जात नाहीत. पण त्यांना आरोग्याविषयी माहिती मिळावी, त्यांच्याशी संवाद साधला जावा म्हणून ‘अर्र्श क्लिनिक’ ही संकल्पना मुंबईत राबवण्यात आली आहे. महाविद्यालयातील ‘रेड रिबिन क्लब’मधील विद्यार्थी हे तरुण आणि रुग्णालय यांच्यातील दुव्याचे काम करणार आहेत. पहिले केंद्र कामा रुग्णालयात स्थापन करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना समस्या किंवा काही प्रश्न असतील, त्यांना या क्लिनिकमध्ये आणले जाईल. अन्य विद्यार्थ्यांशी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संवाद साधून जनजागृती करण्यात येईल, असे डॉ. आचार्य यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कोण देणार माहिती? ‘अर्श क्लिनिक’मध्ये तरुणांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी समुपदेशक असणार आहेत. त्याचबरोबर स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, मानसोपाचारतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ अशा तज्ज्ञ मंडळींची टीम असणार आहे. महाविद्यालयातील ‘रेड रिबिन क्लब’मधील विद्यार्थी हे तरुण आणि रुग्णालय यांच्यातील दुव्याचे काम करणार आहेत. पहिले केंद्र कामा रुग्णालयात स्थापन करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना समस्या किंवा काही प्रश्न असतील, त्यांना या क्लिनिकमध्ये आणले जाईल. अन्य विद्यार्थ्यांशी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संवाद साधून जनजागृती करण्यात येईल, असे डॉ. आचार्य यांनी सांगितले.