Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्न बडोलेंसाठी, उत्तर तावडेंचे

By admin | Updated: July 24, 2015 01:11 IST

सामाजिक न्याय विभागाशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे सभागृहात

मुंबई : सामाजिक न्याय विभागाशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे सभागृहात उपस्थित असताना सामुदायिक जबाबदारीचे कारण देत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका प्रश्नाला उत्तर दिले. विधानसभेत गुरुवारी हा प्रकार घडला.सांगली जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृहांना अनुदान देण्याबाबतचा प्रश्न अनिल बाबर यांनी विचारला होता. त्याच्या लेखी उत्तरातील माहिती सुधारित उत्तरात दडविण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्ष सदस्यांनी केला. त्यावर बडोले उत्तर देत असताना तावडे त्यांच्या मदतीला धावले. यावर राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी बसल्या जागी हरकत घेत काही आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप तावडे यांनी केला आणि गदारोळाला सुरुवात झाली. भाजपा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य आमनेसामने आल्याने गोंधळ वाढला. त्यातच अध्यक्षांनी कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा सामुदायिक जबाबदारी म्हणून मंत्र्यांऐवजी मुख्यमंत्री उत्तर देऊ शकतात अन्य मंत्री नाही, असे मत माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी त्यास दुजोरा दिला. (विशेष प्रतिनिधी)