Join us

उबेरविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उत्तर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:31 IST

केंद्र व राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देशलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मोबाईल ॲपवर आधारित असलेल्या उबेरविरोधात उच्च न्यायालयात ...

केंद्र व राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मोबाईल ॲपवर आधारित असलेल्या उबेरविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. टॅक्सी चालकांविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी उबेरकडे पारदर्शी यंत्रणा नसल्याचा आरोप जनहित याचिकेद्वारे करण्यात आला आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

एखाद्या प्रवाशाला तक्रार करायची असल्यास त्याने ती कुठे करावी, यासंदर्भात माहिती मिळविण्यासाठी कोणाला संपर्क साधावा व संबंधितांचा संपर्क क्रमांक मोबाईल ॲपवर नसल्याने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका व्यवसायाने वकील असलेल्या सविना क्रॅस्टो यांनी दाखल केली आहे.

ही ॲपवर आधारित सेवा असल्याने उबेरने वैधानिक कर्तव्ये पार पाडणे आवश्यक आहे. परवाना देताना घातलेल्या अटींचे पालन करणे, हे उबेरचे कर्तव्य आहे.

परवाना देताना करण्यात आलेल्या अटीनुसार उबेरने त्यांच्या संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपवर कस्टमर केअर नंबर किंवा ई-मेल आयडी उपलब्ध करणे आवश्यक आहे. ॲपमध्ये तक्रार करण्यासाठी एक यंत्रणा उपलब्ध आहे. परंतु, ती पुरेशी नसल्याचे याचिकेत म्हटले आहे.

याचिकाकर्त्याने याचिकेद्वारे महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केल्याचे म्हणत न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश देत या याचिकेवरील सुनावणी १० फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.