Join us  

उपचाराअभावी आणखी एका महिलेचा मुंब्य्रात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 2:58 AM

चुकीचा मृतदेह दिल्याचा आरोप : विनापरवानगी मृतदेह नेल्याचा रुग्णालयाचा दावा

कुमार बडदे ।मुंब्रा : वेळीच उपचार न मिळाल्याने कौसा भागातील शाकिरा शेख या ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या मुलाने केला आहे. मृत्यूपश्चात संबंधित रुग्णालय प्रशासनाने दुसऱ्याचाच मृतदेह आपल्या ताब्यात दिल्याचा आरोप शाकियाच्या कुटुंबीयांनी केला तर परवानगीशिवाय तिच्या कुटुंबीयांनी मृतदेह नेल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

शाकिरा शेख हिला शनिवारी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी जेथे तिच्यावर आधी उपचार सुरु होते, त्यासह चार खाजगी रुग्णालयांत नेले. परंतु या रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात बेड शिल्लक नसल्याचे त्यांना सागण्यात आले. शेवटी ओळखीच्या माध्यमातून दुपारी चार वाजता तिला ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे रात्री आठ वाजता तिचा मृत्यू झाला. वेळीच आॅक्सिजन न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला, तसेच ज्या रुग्णालयात तिचा मृत्यू झाला तेथून दुसºयाच महिलेचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला होता. मृतदेह घरी नेण्यापूर्वी रस्त्यामध्ये कुटुंबीयाच्या हे लक्षात आल्यानंतर रुग्णालयाने मृतदेह बदलून दिल्याचा दावा तिचा मुलगा मुझ्झफर याने केला.मृत महिला कोरोना संशयित असल्याने शासकीय निर्देशानुसार तिचा मृतदेह थेट दफनभूमीत नेण्याबाबत रुग्णालयाकडून कारवाई सुरु असतानाच तिच्या नातेवाईकांनी परवानगी नसतानाही, वैध कागदपत्रांशिवाय रुग्णालयाच्या परीसरात ठेवलेला दुसराच मृतदेह नेल्याचे रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी आफ्रीन सौदागर यांनी ‘लोकमत’ला दिली.