ठाणे : कुख्यात गुंड डी.के. राव याला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर युनिटने तळोजा कारागृहातून शुक्रवारी ताब्यात घेऊन अटक केली. बदलापूर येथील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाकडे तीन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी रावच्या मैत्रिणीसह दोघांना उल्हासनगर युनिटने अटक केली होती. या गुन्ह्यामध्ये रावचाही सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.छोटा राजनचा हस्तक असलेल्या राववर खंडणीसाठी अपहरण, खुनाचा प्रयत्न असे २२ गुन्हे दाखल आहेत. बांधकाम व्यावसायिकाकडे त्याच्या नावाने तीन कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. गोळ्या घालून मारण्याची धमकीही देण्यात आली होती. उल्हासनगर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे आणि अजय कांबळे यांच्या पथकाने त्याची मैत्रीण हबीबा हुसेन खान आणि विक्रांत ऊर्फ विकी प्रकाश जाधव या दोघांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या डी.के.चेही नाव पुढे आल्यानंतर उल्हासनगर न्यायालयाची परवानगी घेऊन कारागृहातून त्याचा ताबा मिळविण्यात आला. ठाणे खंडणीविरोधी पथकही या गुन्ह्याचा समांतर तपास करत आहे. (प्रतिनिधी)
अन्य एका खंडणीप्रकरणी डी.के. राव ताब्यात
By admin | Updated: November 7, 2015 02:58 IST