मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुकंपा तत्त्वावर भरतीच्या मुंबई महापालिकेतील कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेने गुरुवारी महापालिकेच्या आणखी एका अधिकाऱ्याला अटक केली. सुखलाल राठोड (वय ५०) असे त्याचे नाव असून, तो पालिकेच्या जी/दक्षिण वॉर्डमध्ये उपमुख्य निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. या घोटाळ्यात आतापर्यंत सहा जणांना अटक झाली आहे. या रॅकेटकडून प्रत्येक उमेदवाराकडून सरासरी १० ते २० लाख रुपये घेण्यात आले होते. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जाते. महापालिकेतील काही अधिकाऱ्यांसह एक टोळी मृत कर्मचाऱ्यांचे वारस असल्याचे दाखवून सेवेत घेण्यासाठी सक्रिय होती. त्यासाठी बनावट कागदपत्रे, प्रमाणपत्रे बनवून अधिकाऱ्यांकडून त्याला मंजुरी देण्यात येत होती. ६ महिन्यांपूर्वी त्याबाबत एक निनावी अर्ज आल्यानंतर महापालिकेने त्याची स्वतंत्र चौकशी केली असता, त्यात तथ्य असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर याबाबत एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा तपास सध्या गुन्हा शाखेकडे आहे. या प्रकरणी आतापर्यंत पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. तपासातून आणखी काही नावे पुढे आली आहेत. त्यांच्यावर लवकर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
पालिकेचा आणखी एक अधिकारी गजाआड
By admin | Updated: February 5, 2016 03:51 IST