Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत आणखी एक अवाढव्य कॅम्पाकोला

By admin | Updated: March 18, 2015 02:19 IST

नीलम रिअलेटर्स कंपनीने नाहूरमध्ये उभारलेल्या ‘सन रुफ प्रीमिअम रेसीडेन्सीज्’ या श्रीमंतांच्या वसाहतीतल्या दोन टॉवरचे दहा मजले मुंबई महापालिकेने अवैध ठरविले आहेत.

जयेश शिरसाट - मुंबईनीलम रिअलेटर्स कंपनीने नाहूरमध्ये उभारलेल्या ‘सन रुफ प्रीमिअम रेसीडेन्सीज्’ या श्रीमंतांच्या वसाहतीतल्या दोन टॉवरचे दहा मजले मुंबई महापालिकेने अवैध ठरविले आहेत. पालिकेच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी कंपनीचे विकासक चंपालाल वर्धन आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवून अवैध मजल्यांच्या पाडकामास बंदोबस्त पुरविण्याची तयारी दर्शविली आहे.नाहूर रेल्वे स्थानकानजीक गोरेगाव लिंकरोडवर वर्धन यांनी २५ मजल्यांचे दोन आलिशान टॉवर उभारले आहेत. या टॉवरमधील फ्लॅट टूबीएचके आणि त्यापुढील आहेत. प्रत्येक फ्लॅटची किंमत साधारण दीड कोटीच्या घरात आहे. हे बांधकाम ज्या भूखंडावर झाले तेथील भूमिपुत्र कुंदन मोहन पाटील या तरुणाने माहिती अधिकाराचा वापर करून वर्धन यांच्या नीलम रिअलेटर्स कंपनीने केलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडली आहे. सप्टेंबर २०१३मध्ये या अनधिकृत टॉवरप्रकरणी चौकशी व कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना दिले होते. त्यानुसार कुंटे यांनी ‘टी’ विभाग कार्यालयाच्या सहायक आयुक्त चंदा जाधव यांना चौकशी, कारवाई करण्यास सांगितले. जाधव यांनी केलेल्या चौकशी व तपासात वर्धन यांच्या नीलम रिअलेटर्स कंपनीने चार माळ्यांची परवानगी असताना १४ माळे उभारले. ५ ते १४ माळ्यांचे बांधकाम दंड आकारून नियमित करण्यात आले. मात्र त्यानंतर पुढील बांधकामासाठी परवानगी नसताना किंवा तसा  प्रस्ताव अथवा अर्ज देखील नसताना या कंपनीने १५ ते २५ माळ््यांचे बांधकाम केले. जे अवैध आहे. राज्यमंत्री सामंत यांच्या आदेशांपासून या प्रकरणी झालेल्या प्रत्येक कारवाईची कागदपत्रे तक्रारदार पाटील याने माहिती अधिकारात मिळवली असून त्याची एक प्रत ‘लोकमत’कडेही उपलब्ध आहे.१४ माळ्यांवर अवैधपणे मजले चढवले जात असल्याची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त जाधव यांनी नीलम रिअलेटर्स कंपनीला बांधकाम थांबविण्याची नोटीस बजावली. त्यानंतरही हे काम थांबले नाहीच, उलट अधिक वेगाने सुरू झाले. वर्धन यांनी एव्हाना १५ ते २० माळे बांधले होते. तेव्हा टी विभागाने वर्धन यांना एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार नोटीस धाडून चौदाव्या माळ््यावरील अवैध बांधकाम पाडा, हटवा, अन्यथा कारवाईस सामोरे जाण्यास तयार रहा, असे बजावले. मात्र या नोटीशीलाही वर्धन आणि त्यांच्या नीलम रिअलेटर्स कंपनीने भीक न घातल्याने अखेर पालिकेच्या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाण्यात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. यात वर्धन, आर्किटेक्ट सुनील आंब्रे, प्रकल्प व्यवस्थापक संदेश देव या तिघांना आरोपी करण्यात आले. या इमारतींचे अंतर्गत काम सुरु असल्याने अद्याप कोणीही रहिवासी येथे राहायला आलेले नाहीत. काही इमारतींमधील फ्लॅट्सचे बुकिंग देखील सुरु आहे. नोंदविलेल्या गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे. तक्रारीतल्या बाबी पडताळून पाहिल्या जात आहेत. जर पालिकेने या बांधकामाचे अवैध दहा मजले तोडण्याचा निर्णय घेतल्यास आवश्यक तो बंदोबस्त वरिष्ठांच्या परवानगीने देण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामदास मोरे यांनी ‘लोकमत’ला दिली.आम्ही ३५ वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहोत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आम्ही आजवर असंख्य प्रकल्प, इमारती बांधल्या. नाहूरच्या सन रूफ प्रकल्पातील १५ ते २५माळयांसाठी आम्हाला एमआरटीपी कायद्यान्वये नोटीस आली होती. मात्र हे मजले पालिकेकडून नियमीत करून घेतले आहेत. तसे पत्र नवघर पोलिसांनाही दिले आहे. - कुणाल वर्धन, व्यवस्थापकीय संचालक, निलम रिअलेटर्सएमआरटीपीन्वये आम्ही गुन्हा दाखल केला आहे. यात तक्रारदार पालिका अधिकारी आहेत. निलम रिअलेटर्स कंपनीच्या सन रूफ प्रकल्पातील १५ ते २५ अवैध मजले पालिकेने नियमित केले आहेत असे स्पष्ट करणारा कोणताही कागद, पत्रव्यवहार आमच्यापर्यंत आलेला नाही. पालिकेकडून तसे पत्र येणे आवश्यक आहे.- राजाराम मोरे, वरिष्ठ निरिक्षक, नाहून पोलीस ठाणे