Join us

मुंबईतून आणखी ५० हजारांच्या बनावट नोटा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बनावट नोटा बनवून त्या बाजारामध्ये वितरित करण्याच्या बेतात असलेल्या त्रिकुटाला गुरुवारी ठाणे गुन्हे अन्वेषण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : बनावट नोटा बनवून त्या बाजारामध्ये वितरित करण्याच्या बेतात असलेल्या त्रिकुटाला गुरुवारी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली होती. त्यांच्यापैकी चंद्रकांत माने (४५) याच्या मुंबईतील साकीनाका येथील घरातून आणखी ५० हजारांच्या बनावट नोटा या पथकाने हस्तगत केल्या आहेत. आतापर्यंत ८५ लाख ९६ हजारांच्या नोटा या टोळीकडून जप्त केल्या आहेत.

ठाण्यातील कापूरबावडी येथून ९ डिसेंबर रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने सचिन आगरे (२९) याला अटक केली. त्याच्याच चौकशीतून १० डिसेंबर रोजी मन्सूर खान (४५) आणि चंद्रकांत माने (४५) या दोघांना अटक केली होती. या तिघांकडून भारतीय चलनातील दोन हजार रुपये दर्शनी मूल्य असलेल्या ८५ लाख ४८ हजारांच्या बनावट नोटा या पथकाने जप्त केल्या होत्या. त्याचबरोबर, नोटा छपाईसाठी वापरलेले संगणक, प्रिंटर, पेपर रिम्स, शाई, कटर, स्केल आणि मोबाइल फोन आदी सामुग्रीही जप्त केली होती.

नुकसान भरून काढण्यासाठी छापल्या नोटा

यातील सूत्रधार चंद्रकांत याचे कोल्हापूर येथे ज्वेलर्सचे दुकान होते, पण लॉकडाऊनमुळे व्यवसायात त्याला ४० ते ४५ लाखांचे नुकसान झाल्यामुळेच तो आर्थिक विवंचनेत होता. ते भरून काढण्यासाठी त्याने दोन हजारांच्या नोटांच्या छपाईची शक्कल लढविली. त्यासाठी मन्सूर खान या झेरॉक्सचे दुकान चालविणाऱ्यालाही सोबत घेतले. त्यात तो काही प्रिंटिंगचीही कामे करीत होता. त्याच्याच दुकानात सचिन आगरे हा काम करीत होता. या तिघांनी मिळून कॉम्प्यूटर, प्रिंटर आणि इतर सामुग्रीची जमवाजमव करून दोन हजार रुपयांच्या हुबेहूब नोटांच्या छपाईला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी अशा किती नोटा छापल्या, त्यातील बाजारामध्ये किती विक्री केल्या? आणखी नोटा कुठे ठेवल्या आहेत का? याचाही शोध घेण्यात येत आहे.