Join us
Daily Top 2Weekly Top 5

बीएस्सी नर्सिंगसह इतर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियांचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:17 IST

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीयूएमएस, बीओटीएच, बीएस्सी नर्सिंग, बीएएसएलपी, बी(पी अँड ...

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीयूएमएस, बीओटीएच, बीएस्सी नर्सिंग, बीएएसएलपी, बी(पी अँड ओ) अशा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया मंगळवारी जाहीर केली. वेळापत्रकानुसार, पहिल्या फेरीसाठी गुरुवार ३ डिसेंबरपासून अर्जामध्ये पर्याय निवडायचे आहेत.

प्रवेशासाठी प्राथमिक गुणवत्ता यादी बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतर जाहीर झाली. त्यानंतर बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस अशा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या पात्र उमेदवारांची यादी जाहीर होईल. विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमांसाठी ३ ते १० डिसेंबरपर्यंत पसंतीच्या महाविद्यालयांचे पर्याय निवडायचे आहेत. त्यानंतर प्रवेशासाठीच निवड यादी १२ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजल्यानंतर जाहीर हाेईल.

....................................

या निवड यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १३ ते २१ डिसेंबर दरम्यान प्रवेश घ्यायचा आहे; तसेच रीटेन्शन अर्ज भरता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, बीपीटीएच आणि बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमांसाठी नवे महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले आहेत.

राज्यातील विद्यार्थी एमबीबीएस आणि बीडीएस अशा पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची पहिली पसंती असते. मात्र, दोन्ही अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता कमी असल्याने, इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थी बीएचएमएस, बीएएमएस अशा अभ्यासक्रमांसोबतच बीएस्सी नर्सिंगसाठी प्राधान्य देतात. त्यामुळे कमी रँक असणारे राज्यातील आणि परराज्यातील विद्यार्थी या अभ्यासक्रमांची वाट पाहतात. प्रवेश प्रक्रिया जाहीर झाल्याने, प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना; तसेच त्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे. आता ही प्रवेश प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.