Join us  

मुंबई काँग्रेस कार्यकारिणी सदस्यांची झाली घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 1:42 AM

अंतर्गत वादाची चिन्हे; निवडणुकांच्या तोंडावरील नियुक्त्यांमुळे नाराजी

मुंबई : एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असतानाच मुंबई कॉंग्रेस कार्यकारिणीतील सदस्यांची घोषणा करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आठ उपाध्यक्ष, नऊ सरचिटणीस आणि आठ चिटणीसांची नियुक्ती करण्यात आल्याने पुन्हा एकदा मुंबई काँग्रेसमधील कुरबुरी सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबई काँग्रेस कार्यकारणीतील सदस्य, विविध जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांची नियुक्तीबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानुसार आठ उपाध्यक्ष, नऊ सरचिटणीस आणि आठ चिटणीसांसह उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांच्या नावांची घोषणा करणारे पत्रक काँग्रेस सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी प्रसिद्धीस दिले.ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत रिक्त जागा भरण्याचे आदेश काढण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नेते आणि पदाधिकारी निवडणूक कामात व्यस्त झालेले असताना अशा प्रकारचा निर्णय घेणे टाळायला हवे होते, अशी भावना मुंबईतील एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आधीच मुंबई काँग्रेसमध्य मोठ्या प्रमाणावर गटबाजीचे वातावरण आहे. त्याचा थेट निवडणुकीच्या तयारीवर परिणाम होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. तरीही पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर अनेक मंडळी नाराजी असतानाही कामाला लागली होती. त्यातत आता उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि चिटणीसांच्या नियुक्तया करण्यात आल्या.त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी उफाळू येण्याची शक्यता आहे. या नियुक्त्या करताना मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी स्वत:च्या मर्जीतील लोकांची वर्णी लावली आहे. त्यामुळे अनेकजण नाराज झाले आहेत. आचारसंहिता लागू झालेली आहे, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उर्वरित लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोण असेल, याची वाट पाहत आहेत. अशावेळी या नियुक्त्यांचा निर्णय टाळायला हवा होता. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवांमध्येही ताळमेळ नाही. त्याचाही फटका बसला असल्याचे, या नेत्याने सांगितले.नियुक्त्या पुढीलप्रमाणेउपाध्यक्ष : जावेद खान, विरेंद्र बक्षी, युसुफ अब्राहनी, जया पेंगल, सुरेश खोपारकर, बलदेव खोसा, वेळळ्ूस्वामी नायडू, निर्मला प्रभावळकर.सरचिटणीस : जॉर्ज अब्राहम, मनोज दुबे, ब्रिजमोहन शर्मा, विश्व बंधु राय, अर्शद आझमी, बाबूलाल विश्वकर्मा, आनंद शुक्ला, संजीव बग्दी, महेश मलिकचिटणीस: गौरव पंडागळे, शिवा शेट्टी, शान तुर्की, मनोज नायर, प्रकाश पटने, सुर्यकांत मिश्रा, संतोष सिंग, बिपिन विचारे.उत्तर मुंबई : अशोक सुतराळे (जिल्हाध्यक्ष), घनश्याम दुबे (कार्याध्यक्ष); उत्तर पूर्व मुंबई : प्रणीयल नायर (जिल्हाध्यक्ष), विठ्ठल लोकरे आणि आर.आर.सिंग (कार्याध्यक्ष); उत्तर पश्चिम मुंबई: क्लाईव डायस (जिल्हाध्यक्ष), चंद्रशेखर दुबे आणि अनु मलबारी (कार्याध्यक्ष)

टॅग्स :काँग्रेसलोकसभा निवडणूक