Join us  

राणीच्या बागेतील प्राणी, पक्ष्यांची अस्तित्वासाठी झटापट, मृत्यू प्रकरणानंतर शवविच्छेदन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 10:15 AM

राणीच्या बागेतील पक्षी आणि प्राण्यांच्या झालेल्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन सुरू आहे.

मुंबई : राणीच्या बागेतील पक्षी आणि प्राण्यांच्या झालेल्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन सुरू आहे. यातील बहुसंख्य प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू हा अंतर्गत अवयव निकामी होणे, अस्तित्व राखण्यासाठी झालेल्या झटापटी व वृद्धापकाळामुळे झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

राणीच्या बागेतील प्राणी-पक्ष्यांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी केली जाते. जे प्राणी-पक्षी आजारी आढळतात त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जातात. उपचारादरम्यान प्राण्याचा मृत्यू झाला किंवा कुठल्याही प्रकारची आजारपणाची लक्षणे नसतानाही अचानक मृत्यू झाला तर संबंधित प्राणी-पक्ष्याचे शवविच्छेदन करून कारणे जाणून घेतली जातात. राणीच्या बागेतील ३० प्राण्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पालिका प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे.

पालिकेच्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) विविध प्रजातींच्या प्राणी व पक्ष्यांचा अधिवास आहे. एका वर्षात ४७ प्राण्यांचा मृत्यू झाला असून त्यातील बहुतांश हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर प्राणीप्रेमी संघटनांकडून याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर प्रशासनाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

अवयव निकामी होणे, वयोमानामुळे होतात मृत्यू -

१) प्राणी-पक्ष्यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालात प्रथमदर्शनी हृदय, फुप्फुस, मेंदू, किडनी, यकृत इत्यादी अवयवांची तपासणी केली जाते. त्यावरून मृत्यूच्या कारणाचा शोध घेतला जातो. 

२) अनेकदा प्राण्यांचे अवयव निकामी होण्याची बाब समोर येते. यामागची कारणे वेगवेगळी असतात. ज्यामध्ये वृद्धापकाळ, प्राणी-पक्ष्यांमधली झटापटी, त्यातून होणाऱ्या जखमा, अतिरिक्त रक्तस्राव, फुप्फुस-यकृत-मूत्रपिंडाचा आजार, कर्करोग, गर्भाशयाचे आजार आणि ताण-तणाव अशा अनेक बाबींचा समावेश असतो. 

३) फुप्फुस निकामी होणे किंवा एकापेक्षा जास्त अवयव संसर्गामुळे किंवा वृद्धापकाळामुळे देखील निकामी होतात. 

४)  समूहाने राहणाऱ्या प्राण्यांमध्ये (हरीण, पक्षी, माकड इत्यादी) वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अनेकदा झटापटी होतात. यातूनच जखमी होऊन बऱ्याचदा प्राण्यांचा मृत्यू होतो.

५) वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरण प्रकल्पात सर्व प्राण्यांच्या प्रदर्शनी नवीन पद्धतीने तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे नवीन प्राण्यांची देवाण-घेवाण झाली नाही. 

६) सध्या संग्रहालयात हरीण, माकड, पक्षी हे प्राणी आहेत. यातील बऱ्याच पक्ष्यांचे व प्राण्यांचे आयुर्मान कमी झाले आहे. परिणामी या वयस्कर प्राणी-पक्ष्यांचा मृत्यूदर वाढलेला असल्याचे भासते. हरीण प्रजातीच्या नवीन प्रदर्शनी तयार झाल्या आहेत. 

७) यामध्ये इतर प्राणिसंग्रहालयातून वेगवेगळ्या हरणांच्या प्रजाती आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

टॅग्स :मुंबईराणी बगीचा