Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी अनिल परब यांना हवा दोन आठवड्यांचा अवधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब अपेक्षेप्रमाणे मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाकडील (ईडी) चौकशीसाठी गैरहजर राहिले. पूर्वनियोजित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब अपेक्षेप्रमाणे मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाकडील (ईडी) चौकशीसाठी गैरहजर राहिले. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण हजर राहू शकत नसून, दोन आठवड्यांची मुदत वाढवून द्यावी, असे पत्र त्यांच्या वतीने ईडीच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. चौकशी कशाबाबत करावयाची आहे, त्याबाबत माहिती कळवावी, अशी विनंती त्यामध्ये करण्यात आली आहे.

परब चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याच्या शक्यतेने बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नोटीसमध्ये केवळ ‘इन्व्हेस्टीगेशन पार्ट’ इतकेच नमूद करून त्यांना मंगळवारी सकाळी ११ वाजता कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली होती. त्यांच्याकडे १०० कोटी वसुली प्रकरण व सचिन वाझेने एनआयए कोठडीतून लिहिलेल्या पत्रात बीएमसी कॉन्ट्रॅक्टर्सकडून वसुली करण्याबाबत परब यांच्या सूचनेबद्दल चौकशी केली जाणार आहे. मात्र, ईडीच्या नोटीसमध्ये काही नमूद नसल्याने कायदेशीर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार परब यांनी चौकशीला हजर राहण्याचे टाळले आहे. त्यासाठी या दिवशी माझा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी चौकशीला हजर राहू शकत नाही. त्यामुळे दोन आठवड्यांनंतरची वेळ द्यावी, असे पत्र त्यांच्या वतीने वकिलाने ईडीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच चौकशीचे नेमके कारण स्पष्ट करावे, जेणेकरून चौकशीत योग्य माहिती देता येईल’, असेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.