Join us
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त महिलांचा हल्लाबोल

By admin | Updated: August 26, 2014 01:28 IST

रविवारी अर्नाळा येथे डेंग्यूने मृत्युमुखी पडलेल्या ३ जणांचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी अर्नाळ्यात आलेल्या गटविकास अधिका-यांना सुमारे २ तास घेराव घातला

वसई : रविवारी अर्नाळा येथे डेंग्यूने मृत्युमुखी पडलेल्या ३ जणांचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी अर्नाळ्यात आलेल्या गटविकास अधिकाऱ्यांना सुमारे २ तास घेराव घातला. अर्नाळा गावात स्वच्छता मोहिम राबविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर हा घेराव मागे घेण्यात आला. या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक मागविली होती, परंतु अनुचित प्रकार घडला नाही.अर्नाळा गावामध्ये कोळीवाडा येथील तिघा जणांना डेंग्यूची लागण झाली व या तिघांचा त्यात मृत्यू ओढवला. या घटनेनंतर पंचायत समिती व आरोग्य विभागाचे अधिकारी गावात न फिरकल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती. काल या संदर्भात स्थानिक स्वराज्य समितीचे अध्यक्ष राजू तांडेल यांनी गटविकास अधिकारी कुलकर्णी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला व गावातील लोकांच्या भावना कळवल्या. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी वसई पंचायत समिती कार्यालयात उद्या आपण भेटू असे सांगितले. त्यानुसार आज मयत व्यक्तींचे कुटुंबीय व समितीचे पदाधिकारी वसई येथील पंचायत समिती कार्यालयात गेले होते. परंतु गटविकास अधिकारी कुलकर्णी अर्नाळा गावात आल्याने संतापलेले अर्नाळा गावाकडे रवाना झाले. अर्नाळा येथे आल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात बसलेल्या गटविकास अधिकारी कुलकर्णी यांना संतप्त महिलांनी घेराव घातला व त्यांना जाब विचारला. संतप्त महिलांना उत्तरे देताना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. काही काळ तंग वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर गावात युद्ध पातळीवर स्वच्छता मोहिम राबवणे, तापाचे रुग्ण शोधून त्यावर उपचार करणे व प्रत्येक गावपाड्यात औषध फवारणी आदी कामे करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर तांडेल यांनी प्रशासनाने जर थातुरमातूर उपाययोजना केली तर जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा नेऊ असा इशारा दिला. गटविकास अधिकाऱ्यांसमवेत तालुका आरोग्य अधिकारी व आगाशी प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या आंदोलनानंतर पंचायत समिती, ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामस्थ यांच्या समन्वयातुन मोहिम राबवण्याचा निर्णय जाहीर केला. (प्रतिनिधी)