मुंबई : दोन्ही कॉँग्रेससह शिवसेनेकडून होणाऱ्या जोरदार टीकेला सामोरे जावे लागलेल्या भाजपाला, आता मुंबईत युती केलेल्या रिपाइंच्या आठवले गटाकडून घरचा आहेर मिळाला आहे. भाजपाच्या दुटप्पीपणामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे, अशी स्पष्ट कबुली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर सभेत दिली. मात्र, कार्यकर्त्यांनी संयम बाळगून दिलजमाई करीत प्रचारात सक्रिय राहाण्याचे आवाहन त्यांनी केले.आठवले मुंबईत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध प्रभागांमध्ये प्रचार सभा, रॅली घेत आहेत. वांद्रे (पू) येथील सिद्धार्थ कॉलनीत आयोजित सभेत ते म्हणाले, ‘भाजपाने मुंबई महापालिका वगळता राज्यात आरपीआयला सोबत घेतले नाही. मुंबईत आमची १९ जागांवर बोळवण केली. त्यात सहा जागांवर बंडखोरांना आश्रय दिल्याने ते कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातच आता जाहिरातीमधून आपला फोटो गायब केला आहे, तसेच प्रचारासाठी विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. मात्र, त्यांनी थोडा संयम बाळगावा, योग्य वेळी आपण त्याबाबत निर्णय घेऊ. सध्या नाराजी बाजूला ठेवून त्यांच्यासमवेत प्रचारात सक्रिय व्हावे.’आठवले पुढे म्हणाले, ‘मुंबईत रिपाइंची मते निर्णायक आहेत. रिपाइं हा कोणा लुंग्यासुंग्याचा पक्ष नाही, तर संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील विचारधारा असणारा पक्ष आहे. त्यामुळे भाजपाने त्याचा विचार करून कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी,’ असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
भाजपाच्या दुटप्पीपणामुळे नाराज - रामदास आठवले
By admin | Updated: February 17, 2017 02:32 IST