कासा : डहाणू तालुक्यातील अंगणवाडी दुरूस्तीची देयके (बिले) दोन वर्षापासून रखडल्याने हे काम पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायती व ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले असून मजुरी अभावी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.तालुक्यात बांधकाम उपविभागाअंतर्गत २०१३-१४ या आर्थिक वर्षात आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत मंजूर झालेली आंबेसरी, गंजाड (दिवापाडा), गंजाड (दसरापाडा), कैनाड (वाडुपाडा), कैनाड (कोटबीपाडा), चळणी सुकट आंबा, चळणी (गेटीपाडा), धरमपुर, धानिवरी (कडुपाडा) निंबापूर बांधघर पाटीलपाडा, वेती आदी एकरा ठिकाणी १५ लाखाची अंगणवाडी दुरूस्तीची कामे पूर्ण करण्यात आली. यापैकी सात कामे ही त्या गावातील ग्रामपंचायती मार्फत पूर्ण करण्यात आली आहेत. तर उर्वरीत चार कामे ठेकेदारांनी पूर्ण केली आहेत. अंगणवाडी दुरूस्तीची कामे जिल्हापरिषद काम वाटप समितीमार्फत टेंडर पद्धतीने ग्रामपंचायत व ठेकेदारांना दिली होती.दरम्यान अंगणवाडी दुरूस्तीची कामे दोन वर्षापुर्वीच पूर्ण झाल्याने बांधकाम विभागाने कामाची देयके अदायगीसाठी विभागीय कार्यालय जव्हार यांच्याकडे सादर केली परंतु त्याबाबतची तरतूद त्यावेळी नसल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निधी उपलब्ध न होऊन देयके पारित झाली नाही. दरम्यान दोन वर्षे झाली तरी देयके अद्याप निधीचे कारण पुढे करत पडून आहेत. मात्र निधी नव्हता तर काम मंजूर का केली असा प्रश्न सरपंच विचारत असून देयके न मिळाल्याने ग्रा.पं. अडचणीत सापडल्या आहेत. (वार्ताहर)
अंगणवाडी दुरूस्तीची देयके रखडली
By admin | Updated: June 29, 2015 23:16 IST