Join us  

आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने महिलांमध्ये वाढतोय अ‍ॅनिमिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 5:37 AM

पालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती; ८,८६१ महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण ११पेक्षा कमी

- स्नेहा मोरे मुंबई : स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष, खाण्या-पिण्याची हेळसांड या कारणांमुळे महिलांमध्ये रक्तक्षयाचे (अ‍ॅनिमिया) प्रमाण अधिक आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०१९-२० या कालावधीत सुमारे १७ हजार ६१ महिला प्रतिबंधात्मक अ‍ॅनिमियाविषयीचे उपचार घेत आहेत. तर यातील ८ हजार ८६१ महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण ११पेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. मागील दोन वर्षांचा आढावा घेतला असता शहर उपनगरांतील महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे, ही गंभीर बाब असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहर उपनगरात तीव्र अ‍ॅनिमिया असलेल्या महिलांचे प्रमाण २०१९-२० मध्ये ४९७ इतके आहे. तर २०१८-१९ व २०१७-१८ साली अनुक्रमे हे प्रमाण ४९७ , ४४८ इतके होते. तर अ‍ॅनिमियाचे प्रतिबंधात्मक उपचार सुरू असलेल्या गर्भवतींची संख्या २०१८-१९ साली १५ हजार ६५१ होती. आणि २०१७-१८ साली ही संख्या १५ हजार ६९६ इतकी होती. पालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रशेखर चिपळूणकर यांनी सांगितले की, पोषक आहाराच्या अभावामुळे महिलांमध्ये हा आजार दिसून येतो. पालिकेच्या वतीने प्रतिबंधात्मक उपचारांत महिलांना त्वरित पूरक आहार देण्यात येतो. तर सौम्य ते मध्यम अशक्तपणा झालेल्या रुग्णांना पूरक आहार दिला जातो. तीव्र अशक्तपणा असलेल्यांना इंजेक्शन दिली जातात. जेव्हा हिमोग्लोबिनची पातळी सातपेक्षा कमी असते तेव्हा तीव्र अ‍ॅनिमिया म्हणून त्याचे वर्गीकरण केले जाते. प्रसूतीनंतर १८० दिवस नियमितपणे त्या महिलांची तपासणी केली जाते.अ‍ॅनिमिया म्हणजे काय?अ‍ॅनिमिया म्हणजे रक्तातल्या लाल पेशी किंवा हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे रक्ताची आॅक्सिजन वहन करण्याची क्षमता कमी होणे. यामुळे पेशींना मिळणारा आॅक्सिजन कमी होतो आणि अवयवांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो....तर गरोदरपणात गंभीर त्रासएखाद्या स्त्रीच्या शरीरातील अवयवांना जर लाल रक्तपेशींमार्फत आॅक्सिजन पुरवला नसेल तर तिच्या पोटात असलेल्या बाळाला तो आॅक्सिजन कसा पुरेल? गरोदर स्त्रीच्या पोटात आणखी एक जीव असतो. गरोदरपणात खरे तर तिच्या अवयवांना दुपटीने आॅक्सिजन पुरवला गेला पाहिजे. पण अ‍ॅनिमिया असलेल्या गरोदर स्त्रीच्या शरीरात ते शक्य होत नाही. अशात पोटात असताना बाळाची वाढ न होणे, पोटात असल्यापासूनच त्याला कुपोषणाला सामोरे जावे लागणे, या समस्या उद्भवू शकतात, ही चिंतेची बाब आहे. अ‍ॅनिमियाचे निदान झाल्यानंतर तातडीने उपचार घेणे गरजेचे आहे. तसे न केल्यास गरोदरपणात त्याचा त्रास होऊ शकतो.- डॉ. अशोक आनंद, ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञहिमोग्लोबिन ११पेक्षा कमी असलेल्या गर्भवतींची संख्यावर्ष रुग्णसंख्या२०१७-१८ ६,१४६२०१८-१९ ८,८६५२०१९-२० ८,६८१काय आहार घ्यावा?हिमोग्लोबिन व प्रथिनांचे योग्य प्रमाण यांनी अ‍ॅनिमिया टाळता येतो. यासाठी आहारात तेलबिया, सर्व प्रकारच्या साली असलेली कडधान्ये, दूध, पुदिना, लाल भोपळा, शेवग्याच्या शेंगा, गूळ, खजूर, बीट, कोथिंबीर, तसेच सर्व प्रकारचा मांसाहार यांचा समावेश करावा.