- सुशांत मोरे, मुंबईअंधेरी ते विरार पट्ट्यात प्रवास करताना मोठ्या प्रमाणात प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या पट्ट्यातील प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी पश्चिम रेल्वेकडून नियोजन केले जात आहे. सहा महिन्यांत खार ते बोरीवली दरम्यान उपलब्ध असलेला पाचवा मार्ग लोकलसाठी खुला करतानाच, अंधेरी ते विरार दरम्यान दहा फेऱ्या वाढविण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती, विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील अंधेरी ते विरारपर्यंतचा प्रवास हा सर्वात गर्दीचा प्रवास मानला जातो. या पूर्वी सकाळी व संध्याकाळी होणारी गर्दी आता याच पट्ट्यात दिवसभर पाहण्यास मिळते. त्यामुळे या पट्ट्यातील प्रवास सुकर करण्यासाठी रेल्वेकडून सध्या अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड प्रकल्पालाही कात्री देत, अंधेरी ते विरार एलिव्हेटेड प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला. यासाठी १२ ते १३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल निति आयोग व रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी आहे. एलिव्हेटेड प्रकल्पाला कॅबिनेटकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, प्रकल्प पूर्ण होण्यास पाच ते सहा वर्षे लागतील. त्यामुळे पश्चिम रेल्वेने अंधेरी ते विरार पट्ट्यातील प्रवास सुकर करण्यासाठी आधीच नियोजनही सुरू केले आहे. लोकलच्या नव्या वेळापत्रकाची १0 आॅक्टोबरपासून अंमलबजावणी करतानाच, दहा नव्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या. या फेऱ्यांचा बोरीवली, भार्इंदर आणि विरारपर्यंत विस्तार करण्यात आला. आणखी दहा नव्या फेऱ्यांचे नियोजन अंधेरी ते विरार दरम्यान पश्चिम रेल्वेकडून केले जात आहे. या फेऱ्या अंधेरी ते विरार, अंधेरी ते बोरीवली व बोरीवली ते अंधेरी चालविण्याचा प्रयत्न आहे. मात्र, तत्पूर्वी या फेऱ्या वाढविण्याअगोदर खार ते बोरीवलीपर्यंत उपलब्ध असलेला पाचवा मार्ग लोकलसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या काही तांत्रिक कामे केली जात असून, साधारपणे सहा महिने कामे पूर्ण होण्यास लागतील, अशी माहिती जैन यांनी दिली. पाचवा मार्ग लोकलसाठी उपलब्ध झाल्यास, त्यामुळे लोकल प्रवास सुकर होतानाच वेळापत्रकही वक्तशीर राहील, अशी आशा जैन यांनी व्यक्त केली. सध्या पश्चिम रेल्वेवर १ हजार ३२३ लोकल फेऱ्या होतात. यामध्ये १७६ फेऱ्या चर्चगेट ते अंधेरी दरम्यान होत आहेत. त्यामुळे या फेऱ्यांचा अंधेरी ते विरार प्रवाशांना फायदा मिळत नाही.
अंधेरी-विरार लोकल प्रवास होणार सुकर
By admin | Updated: October 21, 2016 03:55 IST