Join us
Daily Top 2Weekly Top 5

...आणि 'रसिकमोहिनी'ला लाभले 'अनमोल' भेटीचे भाग्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :रंगमंचावरील नाटकात घडणारे प्रसंग प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्यादृष्टीने योजिलेले असतात. मात्र काहीवेळा एखाद्या नाटकाची नाळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :

रंगमंचावरील नाटकात घडणारे प्रसंग प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्यादृष्टीने योजिलेले असतात. मात्र काहीवेळा एखाद्या नाटकाची नाळ प्रेक्षागृहातल्या एखाद्या रसिकाच्या मनाशी तंतोतंत जुळते आणि अशावेळी त्याला त्याच्या आयुष्याचे प्रतिबिंब रंगभूमीवर दिसू लागते. 'जन्मरहस्य' या नाटकाच्या एका प्रयोगाच्या दरम्यान असाच एक प्रसंग घडला आणि रंगमंच व प्रेक्षागृहातली सीमारेषा पुसट होत गेली.

याच आठवड्यात होऊन गेलेल्या 'वर्ल्ड स्क्रिझोफेनिआ डे'च्या निमित्ताने, 'स्क्रिझोफेनिआ' या विषयावर बेतलेल्या 'जन्मरहस्य' नाटकाच्या एका प्रयोगाच्या दरम्यान घडलेली एक हृदयघटना या नाटकाच्या निर्मात्या व अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांनी शेअर केली आहे.

'रसिकमोहिनी' निर्मित व डॉ. आनंद नाडकर्णी लिखित 'जन्मरहस्य' या नाटकाचा प्रयोग बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादात रंगला होता. नाटकाच्या कथेनुसार सगळे प्रसंग घडल्यावर, एका नाट्यपूर्ण घटनेनंतर नाटकाचा पडदा पडला.

प्रयोग संपल्यावर नाटकातले कलावंत मेकअप्‌ उतरवून घरी जाण्याच्या गडबडीत होते; तर बॅकस्टेजचे कलाकार सामान आवरत होते. निर्मात्या भाग्यश्री देसाई या मॅनेजरच्या मदतीने हिशेबात मग्न होत्या. तेवढ्यात त्यांचे लक्ष, हातात कापडी पिशवी घेऊन तिथे उभ्या असलेल्या एका वयस्कर गृहस्थांकडे गेले. त्यांनी त्यांची विचारपूस केली असता, ते निर्मात्यांनाच भेटायला आल्याचे समजले.

देसाई यांनी त्यांना स्वतःची ओळख दिल्यावर त्यांनी नाटकाचे कौतुक करत, त्यांना एक भेट द्यायची असल्याचे सांगितले. भाग्यश्री देसाई यांनी 'भेट वगैरे नको; तुमच्यासारख्या प्रेक्षकांच्या पसंतीची पावती हीच आमच्यासाठी अनमोल भेट आहे', असे त्यांना सांगितले. त्यावर ते गृहस्थ जे उत्तरले, त्याने तिथले वातावरण एकदम बदलून गेले. ते म्हणाले, 'माझ्या घरी तुमच्या नाटकासारखीच स्थिती आहे. माझ्या पत्नीला स्क्रिझोफेनिआ आहे आणि या नाटकातल्या नवऱ्याची घालमेल मी रोजच अनुभवतोय. पण आज या नाटकाने माझे डोळे उघडले. यापुढे मी माझ्या पत्नीला जास्तीत जास्त समजून घेईन आणि तिची मनापासून काळजी घेईन'.

डोळे टिपत हे बोलत असतानाच, भेट स्वीकारावी यासाठी त्यांचा आग्रह सुरूच होता. शेवटी, नाही म्हणू नका, असे म्हणत त्या गृहस्थांनी त्यांच्या हातात असलेली कापडी पिशवी देसाई यांच्या हाती सरकवली आणि आल्यापावली ते निघूनही गेले. देसाई यांनी पिशवीत डोकावून पाहिले, तर त्यात मोजकीच वांगी, काकडी, गाजरे, दुधीभोपळा अशी भाजी होती. 'जन्मरहस्य' पाहून पार भारावलेल्या या प्रेक्षकाने उत्स्फूर्तपणे भेट म्हणून ती या नाटकाच्या निर्मातीला देऊन टाकली होती.

चौकट:

भेट 'अनमोल' ठरली...

- भाग्यश्री देसाई (नाट्यनिर्मात्या)

नाटकानंतर त्या गृहस्थांनी दिलेली भेट पाहून मला अश्रू अनावर झाले होते. सोने, हिरे, माणके काय किंवा जगातल्या कोणत्याही मौल्यवान वस्तूपेक्षाही त्याक्षणी भेट म्हणून मिळालेली वांगी, काकडी वगैरे माझ्यासाठी अत्यंत 'अनमोल' होती.