अनिकेत घमंडी, डोंबिवलीपंतप्रधान मोदी यांच्या योजनेनुसार ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी आदर्श ग्राम म्हणून विकसीत करण्यासाठी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पिंपरी गावाची निवड केली आहे. शनिवारी त्यांनी पिंपरीचा पाहणी दौरा केला. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे त्यांचा गाव शोध संपुष्टात आल्याचे समाधान त्यांना मिळाल्याचे दिसून आले. लोकमतने सर्वप्रथम विचारे यांना गाव मिळेना, अशा आशयाचे वृत्त दिले होते.विचारे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, परंतु ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ग्रामपंचायत नसल्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील पिंपरी गावाची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोयना धरण निर्मितीवेळी विस्थापित झालेले नागरिक पिंपरी गावामध्ये आहेत. पिंपरी गावाची लोकसंख्या ३८८१ असून ३८० कुटुंबे वास्तव्यास आहेत. ज्या कोयना प्रकल्पाने राज्याला वीज आणि पाणी पुरवले, त्याच भागातून पुनर्वसन झालेले नागरिक पाणी आणि विजेपासून वंचित होते. पिंपरी गावातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात येतील, असे आश्वासन खासदार राजन विचारे यांनी दिले आहे. या वेळी स्थानिक आमदार सुभाष भोईर व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यामुळे ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
...आणि राजन विचारेंचा शोध संपला
By admin | Updated: November 30, 2014 22:41 IST