Join us  

...आणि पोलीस ठाणे बनले दुसरे घर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 5:44 AM

घरात एकट्या असलेल्या वृद्धाना सध्या मुंबई पोलिसांचाच आधार

मुंबई : घरात एकट्या असलेल्या वृद्धाना सध्या मुंबई पोलिसांचाच आधार असल्याचे चित्र पहावयास मिळते. घरातल्या रेशनिंगपासून गॅस, लाइटबिल, औषध आणण्यासाठी पोलीस त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेताना दिसत आहे. अशात, त्यांच्यातील नाळ अधिक घट्ट होताना दिसत आहे. विलेपार्लेतील ८३ वर्षीय लेले आजोबासाठी, तर पोलीस ठाणे दुसरे घरच बनले आहे.मुंबईत एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक तसेच वृद्ध आजी आजोबांची माहिती पोलीस दफ्तरी नोंद आहे. अशात प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत त्यांच्या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीगाठी तसेच त्यांच्या प्रत्येक कॉलला मुंबई पोलीस धावून जाताना दिसत आहे.विलेपार्ले पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र काणे यांनी नवीन वर्षानिमित्त कॉर्नर मिटिंग सुरू केल्या आहेत. त्यांच्या बैठकीला विलेपार्ले करांचाही भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या बैठकीअंतर्गत ते ज्येष्ठ नागरिकांची होणारी फसवणूक आणि महिला संबंधित अत्याचारावर विशेष जनजागृती करत आहेत. यात गुन्हा कसा घडतो? त्यावर कशा पद्धतीने नियंत्रण आणता येईल याबाबत ते मार्गदर्शन करत आहेत. आता पर्यंत एकूण ७३ मिटिंग पार पडल्या आहेत.अशातच विलेपार्ले परिसरात एकटे राहणाऱ्या ८३ वर्षीय लेले आजोबांसाठी पोलीस ठाणे जणू दूसरे घरच बनले आहे. काणे सांगतात, २००५ मध्ये लेले आजोबांसोबत ओळख झाली. घरात एकटे असल्याने पोलिसांसोबत गप्पा मारणे हा त्यांचा दिनक्रमच. अशात कधी त्यांची बोलण्याची इच्छा झाली की मी घरी जातो. किंवा त्यांना पोलीस ठाण्यात घेउन येण्यासाठी गाडी पाठवितो. तास, दोन तास त्यांच्या गप्पांमध्ये जातात आणि ते आता माझ्या वडिलांसारखेच झाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई पोलीस